गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 12:49 PM2022-03-11T12:49:35+5:302022-03-11T13:06:22+5:30

धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला.

539 metric tons of rice was spilled on the ground sent by Food Corporation of India | गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

Next
ठळक मुद्देसाडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ सांडला सहा महिन्यांपासून चिमुकले वंचित

यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठविला जाणारा तांदूळ अक्षरश: मजुरांच्या पायाखाली तुडविला जात आहे. भारतीय अन्न महामंडळाने मजबूत पोत्यांची सोय न केल्यामुळे तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ सांडला. येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. आधीच सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा नसताना आता कसाबसा आलेला तांदूळही पायदळी तुडविला गेल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे आणखी काही दिवस हाल होणार आहेत.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेतून शाळेत गरमागरम चवदार खिचडी दिली जाते. कोरोनाकाळात शाळेत खिचडी शिजविणे थांबले. त्याऐवजी विद्यार्थ्यांना घरपोच तांदूळ दिले जात आहे. मात्र, ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर या कालावधीतील तांदूळ जिल्ह्यात आलाच नाही. या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीचा १९७९ मेट्रिक टन आणि चौथ्या तिमाहीचा ५०० मेट्रिक टन, असा एकूण २४९८.६७ मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यात पोहोचला नव्हता.

त्यातच जानेवारी २०२२ ते मार्च या तिमाहीसाठी शिक्षण विभागाने वर्ग १ ते ५ साठी १२३ मेट्रिक टन व वर्ग ६ ते ८ साठी ९५६.६४ मेट्रिक टन तांदळाची मागणी भारतीय अन्न महामंडळाच्या अमरावती येथील व्यवस्थापकांकडे नोंदविली. हा तांदूळ महामंडळाने जिल्ह्यात पाठविला. परंतु येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात जेव्हा हा १४४० मेट्रिक टन तांदूळ पोहोचला तेव्हा तांदळाची पोती अत्यंत जीर्ण असल्याचे दिसून आले. हमालांनी पोते उचलताच फाटून त्यातील अर्धा अधिक तांदूळ खाली सांडला. त्यावर अक्षरश: मजुरांचे पाय पडले. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ जमिनीवर साचला. त्यामुळे संबंधित पुरवठादाराने जेव्हा शाळांपर्यंत तांदूळ पोहोचविण्यासाठी या गोदामातून ४२० पोत्यांची उचल केली, तेव्हा त्यात २५२ पोते फाटलेले आणि हातशिलाई केलेले आढळून आले.

पुरवठादाराने कसाबसा हा तांदूळ या महिन्यात शाळांपर्यंत नेला असता पोत्यांची अवस्था पाहूनच अनेक मुख्याध्यापकांनी तांदूळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे १८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांना तांदूळ मिळाला नाही. मजुरांनी पायदळी तुडविलेला तांदूळ आता शाळेपर्यंत पोहोचविला गेला, तरी त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उन्हाळी सुटीतील खिचडी शिजणार का?

जीर्ण पोत्यांमुळे साडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ कमी आल्याची तक्रार शिक्षण विभागाने एफसीआयकडे नोंदविली आहे. मुळात एफसीआयच्या धामणगाव येथील डेपोमधून मागणी केलेल्या १९७९ मेट्रिक टन पैकी केवळ १४४० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा करण्यात आला. त्यात ५१८ मेट्रिक टन कमी पाठविण्यात आले. तर आलेल्या १४४० मेट्रिक टनातूनही ५३९ मेट्रिक टन तांदूळ जीर्ण पोत्यांमुळे खाली सांडला. आता तरी चांगल्या पोत्यांचा वापर करून तांदूळ पाठवावा, अशी मागणी एफसीआयकडे करण्यात आली आहे. मात्र, या मागणीची मुदत ३१ मार्च असून तोपर्यंत तांदूळ न आल्यास उन्हाळी सुटीच्या कालावधीतील गोरगरीब विद्यार्थ्यांची खिचडी शिजणे कठीण आहे.

Web Title: 539 metric tons of rice was spilled on the ground sent by Food Corporation of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.