पूस धरणात ५४ टक्के जलसाठा
By admin | Published: July 27, 2016 12:37 AM2016-07-27T00:37:17+5:302016-07-27T00:37:17+5:30
तालुक्यावर यंदा वरूण राजाची कृपादृष्टी असून जून आणि जुलै या दोन महिन्यात तब्बल ५६५ मिमी पाऊस कोसळला असून शहरासाठी संजीवनी...
तालुका सुखावला : ६६५ मिमी पावसाची नोंद
पुसद : तालुक्यावर यंदा वरूण राजाची कृपादृष्टी असून जून आणि जुलै या दोन महिन्यात तब्बल ५६५ मिमी पाऊस कोसळला असून शहरासाठी संजीवनी असलेल्या पूस धरणात ५४ टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्यातील माळपठारासह सर्वत्र धरतीने हिरवाशालू पांघरला आहे.
पुसद तालुक्यात यंदा खरीप हंगामात ७४ हजार ७०३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यात २७ हजार ९५० हेक्टर सोयाबीन, २४ हजार ५०० हेक्टर कापूस, १२ हजार हेक्टर तूर, सहा हजार हेक्टर ज्वारी, १२०० हेक्टर मूग, ११०० हेक्टर उडीद, १४० हेक्टर हळद आणि ४१० हेक्टरवर भाजीपाला पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची अवकृपा असल्याने पुसद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
पुसद शहरासाठी संजीवनी असलेल्या पूस धरणात उन्हाळ्यात एक टक्का जलसाठा होता. मात्र आता बरसलेल्या पावसाने या प्रकल्पात ५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. असाच पाऊस बरसत राहिल्यास हा प्रकल्प लवकरच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागात सध्या डवरणी, निंदण आदी कामे सुरू आहे. (प्रतिनिधी)