विद्यार्थिनीशी चाळे करणाऱ्या 55 वर्षीय शिक्षकाला ग्रामस्थांनी चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 11:18 PM2021-08-07T23:18:44+5:302021-08-07T23:19:05+5:30
ग्रामीण पोलिसांनी केली सुटका : मुलीचे आई-वडील पोहोचले पोलीस ठाण्यात
यवतमाळ : प्राथमिक शाळेतील ५५ वर्षीय शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला नादी लावले. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ती मुलगी महाविद्यालयात गेल्यानंतरही शिक्षक तिला एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने शाळेत बोलवत होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. शनिवारी शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. त्याला बेदम चोप देण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून बळाचा वापर करत शिक्षकाची सुटका केली.
अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पथकासह बेलोरा येथे पोहोचले. मात्र कृत्यामुळे संतापलेले ग्रामस्थ शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी परिस्थिती ओळखून बळाचा वापर करत अरुण राठोड याची जमावाच्या तावडीतून सुटका केली. विद्यार्थिनीला व त्या अरुण राठोड याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांशी त्यांनी चर्चा केली. या प्रकरणात तक्रार प्राप्त होताच कठोर कारवाई केली जाईल असेही यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
शिक्षकाचा भाऊ बचावला
अरुण राठोड याला शाळेत डांबून ग्रामस्थ चोप देत असल्याची माहिती मिळताच जवळा येथून त्याचा भाऊ बेलोरा येथे पोहाेचला. त्यालाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी अरुण राठोडच्या मुली व भावाला तेथून जाण्यास सांगितले. जमावाने अरुण राठोडची दुचाकीही पेटवून दिली. काही काळ बेलोरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.