तुरीचे ५५९ कोटींचे चुकारे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:15 AM2018-04-06T04:15:24+5:302018-04-06T04:15:24+5:30
नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही.
- रूपेश उत्तरवार
यवतमाळ - नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, राज्यात ७० टक्के तुरीची खरेदी शिल्लक असून १८ एप्रिलपासून खरेदी केंद्रे बंद होणार आहेत.
खुल्या बाजारात तुरीचे दर पडले. त्यामुळे राज्यभरातील शेतकºयांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे धाव घेतली. आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. नोंदणीकृत शेतकºयांपैकी एक लाख ३० हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. या शेतकºयांनी नाफेडला १६ लाख क्विंटल तूर विकली आहे. नाफेडच्या हमी दरानुसार या तुरीची किंमत ८६४ कोटी असून प्रत्यक्षात ३०५ कोटींचे चुकारे शेतकºयांपर्यंत वळते झाले आहेत. तूर लागवडीपैकी ४४.६ लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले होते. आतापर्यंत १६ लाख क्विंटल खरेदी झाली आहे. आणखी ७० टक्के तूर खरेदी होणे बाकी आहे. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलला संपणार आहे. विशेष म्हणजे, या १४ दिवसांत नोंदणीकृत तुरीची खरेदी करणे अशक्य आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक गोदामांमध्ये तूर ठेवण्यास जागा नाही. अशा स्थितीत सहकार विभाग काय निर्णय घेतो, यावर खरेदीची गती ठरणार आहे.
शेतकºयांच्या तुरीचे चुकारे देण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. स्थिती पाहून खरेदीची मुदत वाढवायची की नाही, यावरही निर्णय घेतला जाईल.
- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री