११८० किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी ५६ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:48 PM2017-10-03T21:48:14+5:302017-10-03T21:48:41+5:30
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा मुहूर्त निघाला आहे. जिल्ह्यात एक हजार १८० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोन वर्षाकरिता ५६ कोटी रुपये लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा मुहूर्त निघाला आहे. जिल्ह्यात एक हजार १८० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोन वर्षाकरिता ५६ कोटी रुपये लागणार आहेत.
यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जात होती. परंतु यावर्षीपासून हा पॅटर्न बदलविण्यात आला आहे. आता देखभाल दुरुस्तीचे थेट दोन वर्षांसाठी कंत्राट दिले जात आहेत. हा नवा प्रयोग बांधकाम खात्याने यंदापासून हाती घेतला. राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने द्वि-वार्षिक निविदा जारी केल्या आहेत. त्याचे बजेट ५६ कोटी रुपयांचे आहे. त्यातून एक हजार १८० किलोमीटरचे रस्ते कव्हर होणार आहे. त्यातही सर्वाधिक देखभाल दुरुस्ती ही पुसद व पांढरकवडा विभागातील रस्त्यांची करावी लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने ५६ कोटी रुपयांच्या द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा यापूर्वीच जारी केल्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कारण कंत्राटदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामांवर बहिष्कार टाकला आहे. तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने आता दुसºयांदा निविदा जारी केल्या आहेत. त्याला कंत्राटदारांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरते.
कंत्राटदारांचा सुरू असलेला बहिष्कार व संप मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जणू रोजच बैठका होत आहे. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र बांधकाम विभागाला आता संप मिटण्याची आशा आहे. कंत्राटदारांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. या मागण्या मंजुरीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लवकरच कंत्राटदारांचा बहिष्कार संपण्याची अपेक्षा असल्याचे बांधकाम खात्यातून सांगण्यात आले. अभियंत्यांनासुध्दा संप मिटण्याची, निविदांना प्रतिसाद मिळण्याची व कामकाज रूळावर येण्याची प्रतीक्षा आले.
यवतमाळ-वर्धासाठी १०४३ कोटी
केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात वर्धा जिल्ह्यात चार हजार ६९८ कोटींच्या कामांचे पॅकेज मंजूर केले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याशी जोडणाºया दोन कामांचा समावेश आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्टÑीय महामार्ग क्र. ३६१ वरील यवतमाळ ते वर्धा या ६५ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी एक हजार ४३ कोटी रुपये पॅकेजमधून मंजूर झाले आहेत. या मार्गात तीन मोठे व ३० लहान पूल राहणार आहे. याशिवाय वडनेर ते राळेगाव या २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २१० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.