जिल्हा परिषद सभागृहात दिसणार ५७ नवीन चेहरे
By admin | Published: February 27, 2017 12:47 AM2017-02-27T00:47:28+5:302017-02-27T00:47:28+5:30
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती,
केवळ चारच अनुभवी : प्रशासनाला पहिल्या सभेची उत्सुकता
रवींद्र चांदेकर यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती, तशीच यंदा जिल्हा परिषद सभागृहाची झाली आहे. केवळ चार सदस्य अनुभवी असून तेही आपल्या कार्यकाळात फारसे आक्रमक नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सदस्यांवर प्रशासन हावी होणार, हे निश्चित.
६१ सदस्यांपैकी तब्बल ५७ सदस्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढत आहे. यापूर्वी ते कधीही जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हते. उर्वरित चार सदस्य एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे यावेळी अननुभवी सदस्यांची गर्दी वाढली आहे. यापूर्वीच्या सभागृहात अनेक अनुभवी आणि अभ्यासू सदस्य होते. त्यात बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, देवानंद पवार, अमोल राठोड आदींचा समावेश होता. हे सर्व सदस्य दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळ जिल्हा परिषदेत निवडून आले होते. मात्र यावेळी काहींनी रिंगणातूनच माघार घेतली, तर काहींना निवडणूक लढवूनही अपयश आले. परिणामी अनेक अननुभवी सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत.
चार अनुभवी सदस्यांमध्ये वरध-झाडगाव गटातून विजयी झालेले भाजपाचे चित्तरंजन कोल्हे, नांझा-मेंढला गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या जया पोटे, मुडाणा-फुलसावंगीतून विजयी झालेले शिवसेनेचे डॉ. बी.एन. चव्हाण आणि मोख-आरंभी गटातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्य डॉ. रूक्मीणी उकंडे यांचा समावेश आहे. हे चारही सदस्य अभ्यासू असल्याचे यापूर्वी दिसून आले.
या निवडणुकीत तातू देशमुख, देवानंद पवार, दादाराव गव्हाळे, महादेव सुपारे, सीमा तेलंगे, शरद चिकाटे, मंगल मडावी, योगेश पारवेकर, सुलोचना भोयर, सुभाष ठोकळ, लता खांदवे, आरती फुपाटे, मुबारक तंवर, ययाती नाईक, गोदावरी इंगळे आदी आजी-माजी सदस्यांचा पराभव झाला. ते सभागृहात पोहोचले असते, तर अभ्यास व सभागृह दणाणून सोडणाऱ्या सदस्यांचा कोरम पूर्ण झाला असता. आता ही जबाबदारी नवख्या सदस्यांवर येऊन पडली आहे. अन्यता प्रशासन त्यांच्यावर भारी पडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा वचक राहणार
जिल्हा परिषदेत बहुतांश सदस्य नवखे असले, तरी यापुढे प्रशासनावर शिवसेनेचा वचक राहण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विश्वासातील सदस्य अध्यक्षपदी आरूढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचा जिल्हा परिषदेतील वावर वाढणार आहे. त्यांचे बंधू विजय राठोड यांच्या हाती सर्व सूत्रे राहण्याची शक्यता आहे. कदाचित उपाध्यक्षपदी विजय राठोड विराजमान होण्याचीही दाट शक्यता आहे. एकप्रकारे आता जिल्हा परिषदेवर भगवे वादळ घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी प्रशासनाच्या वरचढ ठरण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.