यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:33 PM2019-06-12T13:33:57+5:302019-06-12T13:35:59+5:30
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये यंत्र साहित्याच्या खरेदीसाठी ४० ते ६० टक्केपर्यंत मदत दिली जाणार आहे. त्यासाठी सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
अनेक पिढ्यांपासून शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करीत आहेत. नव्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री शेतकऱ्यांकडे नाही. यामुळे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. या माध्यमातून सर्वच घटकातील शेतकऱ्यांना अनुदानावर यंत्र साहित्य मिळणार आहे. ४० ते ६० टक्केपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
यामध्ये अल्प, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ५० ते ६० टक्के अनुदानावर साहित्य दिले जाणार आहे. इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना २३ जूनपर्यंत तालुका कृषी कार्यालयात सातबारासह अर्ज करावा लागणार आहे. त्यातून ‘लकी ड्रॉ’द्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
२० हजार ते अडीच लाख अनुदान
या योजनेत ट्रॅक्टर, स्वयंचलीत यंत्रे आणि औजारांचा समावेश आहे. कल्टीव्हेटर, पल्टीनांगर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, शुगरकेन कटर, सर्व प्रकारचे थ्रेशर, मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकींग मशिन, राईस मिल, दालमिल, पºहाटी थ्रेशर, ब्रश कटर याकरिता २० हजारांपासून अडीच लाखांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
विदर्भासाठी अनुदान मर्यादा वाढवा
या योजनेत प्रत्येक भागासाठी उद्दिष्ट देण्यात आले. विदर्भातील गरजवंत शेतकऱ्यांकडे सध्या बियाणे घेण्याचीच ऐपत नाही. अशा स्थितीत यंत्र खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे विदर्भात अनुदानाची मर्यादा वाढविल्यास शेतकरी काही रक्कम गोळा करून साहित्यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे किमान विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे.