६० हजार स्मार्ट कार्ड एकाच संगणकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 10:27 PM2019-11-23T22:27:04+5:302019-11-23T22:27:29+5:30
परिवहन महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६० हजारांवर प्रवासी मासिक सवलत पास घेतात. मात्र हे मॅन्यूअल पासेस आता रद्द करून परिवहन महामंडळ स्मार्ट कार्ड देणार आहे. विशेष म्हणजे, या ६० हजार प्रवाशांमध्ये जवळपास ५० हजार विद्यार्थीच आहेत. विविध खेड्यातून यवतमाळातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ते दररोज ये-जा करतात.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खेड्यातून शिक्षणासाठी यवतमाळात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या ‘अतिस्मार्ट’ कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील ६० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र हजारो नावांच्या रजिस्ट्रेशनचे काम एकाच संगणकावर सोपवून महामंडळ प्रशासन मोकळे झाले. त्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी येणाºया विद्यार्थ्यांना एकतर रांगेत राहावे लागत आहे किंवा पुढची तारीख घेऊन गावाकडे परत जावे लागत आहे.
परिवहन महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६० हजारांवर प्रवासी मासिक सवलत पास घेतात. मात्र हे मॅन्यूअल पासेस आता रद्द करून परिवहन महामंडळ स्मार्ट कार्ड देणार आहे. विशेष म्हणजे, या ६० हजार प्रवाशांमध्ये जवळपास ५० हजार विद्यार्थीच आहेत. विविध खेड्यातून यवतमाळातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ते दररोज ये-जा करतात. त्यासाठी यवतमाळ आगारातून त्यांना सवलत पास देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना महामंडळाकडून स्मार्ट कार्ड घ्यावे लागत आहे.
महामंडळाचा प्रयत्न स्तुत्यच आहे. मात्र असे स्मार्ट कार्ड देण्याची पद्धती सध्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. आधी विद्यार्थ्यांना आपले आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच कार्ड मिळते. परंतु, या रजिस्ट्रेशनकरिता महामंडळाने केवळ एकच सेंटर यवतमाळ आगारात दिले आहे. त्यातही या सेंटरमध्ये रजिस्ट्रेशनसाठी एकच माणूस आणि एकच संगणक देण्यात आला आहे. परिणामी दररोज शेकडोच्या संख्येत येणाºया विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रजिस्ट्रेशनसाठी रांगेतच राहावे लागत आहे. एकाच संगणकावर काम उरकणे कठीण झाले आहे. लिंक फेल होणे, वेब कॅमेºयातील अडचणी यामुळे अनेकांना महामंडळातर्फे आठ दिवसानंतरची तारीख दिली जात आहे. अशी ‘तारीख पे तारीख’ टाळण्यासाठी विद्यार्थी शाळा-कॉलेजला दांडी मारून एसटी आगारात गर्दी करीत आहेत.
खासगी सेंटरवर लूट
स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशनसाठी यवतमाळ आगारात गर्दी पेलवत नसल्याने आता स्टेट बँक चौक आणि भोसा रोड परिसरात खासगी व्यक्तींना रजिस्ट्रेशनचे काम सोपविण्यात आले. मात्र आगारात प्रती विद्यार्थी ५० रुपये तर खासगी व्यक्तीकडे ७०-८० रुपये आकारले जात आहे. त्यामुळे आगारातच गर्दी होत आहे. महामंडळाने जूनपासून रजिस्ट्रेशन सुरू केले. तरीही जिल्ह्यातील ५० हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. केवळ १२ हजार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. त्यापैकी केवळ ७ हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत कार्ड मिळू शकले. विशेष म्हणजे, महामंडळाने रजिस्ट्रेशन पूर्ण होण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर केली आहे.
बहुउपयोगी असेल स्मार्ट कार्ड
प्रवास सवलत ६६.६६ टक्के
कार्डची व्हॅलिडीटी ५ वर्षे
स्वाईप मशीनवरून रिचार्ज करता येईल
लवकरच खासगी बसमध्येही वापरणार
खरेदीसाठीही स्वाईप करता येईल