‘एसटी’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:21 AM2020-07-18T11:21:39+5:302020-07-18T11:22:21+5:30

रोजंदार गट-१ च्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरित्या खंडित करण्यात आली. काही आगारांमध्ये या कर्मचाऱ्यांची सेवा आधीच बंद केली गेली होती.

6,000 employees of ST dismissed.. | ‘एसटी’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ..

‘एसटी’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ..

Next
ठळक मुद्देदीड हजार अनुकंपा उमेदवारांवरही गंडांतर

विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सरळसेवा भरतीने एसटी महामंडळात दाखल झालेल्या सहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार १७ जुलै रोजी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी यासंबंधीचा आदेश काढला. विशेष असे, अनुकंपा नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांची सेवाही थांबविण्यात आली.
कोरोनाचा विळखा घट्ट झाला असल्याने एसटीची केवळ जिल्ह्यांतर्गत सेवा सुरू आहे. त्यातही क्षमतेपेक्षा अर्धेच प्रवासी घेऊन वाहतूक केली जात आहे. प्रवासीही बसस्थानकाकडे फिरकत नसल्याने तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने पैसा वाचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. याचा मार कर्मचाऱ्यांना बसतो आहे. आधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावली गेली. आता रोजंदार गट-१ च्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरित्या खंडित करण्यात आली. काही आगारांमध्ये या कर्मचाऱ्यांची सेवा आधीच बंद केली गेली होती.

आठ हजार चालक, वाहकांची भरती
सरळसेवा भरती अंतर्गत सन २०१९ मध्ये चालक तथा वाहकांची भरती करण्यात आली होती. राज्यभरात या प्रवर्गातील एक हजार ५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तीन हजार ५०० कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत. सहायक, लिपिक, टंकलेखक, राज्य संवर्ग व अधिकारी आदींचा त्यात समावेश आहे. एक हजार ५०० उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यात आले आहे. यातील काही लोकांचे प्रशिक्षण सुरू आहे.

‘काम केले तरच दाम’चे धोरण
बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे रोजंदार गट क्र.१ मधील कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळत नाही. ‘काम केले तरच दाम’ असे एसटीचे धोरण आहे. रोजंदार कर्मचाऱ्यांना कामच दिले जाणार नसल्याने त्यांना पगारच मिळत नव्हता. आता जाहीरपणे त्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आली. पुढील काळात आवश्यकतेनुसार त्यांना ज्येष्ठतेनुसार सामावून घेतले जाणार आहे.

अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा
चालक, वाहकांची भरती पदांच्या आवश्यकतेनुसारच केली, मग आता सेवा तात्पुरती खंडित कशासाठी, असा प्रश्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी उपस्थित केला आहे. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

नोकऱ्या सोडून एसटीत दाखल
पहिल्या नोकऱ्या सोडून एसटीत दाखल झालेल्या चालक-वाहकांवर आता सेवा खंडित केल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. अनुकंपा नोकरीवरील वारसाचे प्रशिक्षण अथवा नोकरी थांबविणे अन्यायकारक असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: 6,000 employees of ST dismissed..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.