पश्चिम विदर्भात सहा महिन्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 01:33 PM2022-09-05T13:33:05+5:302022-09-05T13:37:03+5:30
२०१ कुटुंबांना मिळाली मदत : २२७ प्रकरणांची चौकशीच सुरू
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मदतीचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ २०१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे.
विविध कारणांमुळे झालेली नापिकी, उत्पन्न न झाल्याने डोक्यावर वाढलेले कर्ज, वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी लावला जात असलेला तगादा, आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. यावर नियंत्रणासाठी समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार, आदी उपाययोजना शासनाकडून आखण्यात आलेल्या आहे. गावपातळीवरही समित्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात (१७५) झाल्या आहेत. त्या खालोखाल बुलडाणा (१५६) आणि यवतमाळ (१४३) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. अकोला जिल्ह्यात ७५, तर वाशिम जिल्ह्यात ६३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीतील या घटना आहेत. चौकशीची प्रकरणेही निकाली काढण्यात विलंब लावला जात असल्याचे दिसून येते. तब्बल २२७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. परंतु, अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित राहिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ उके यांनी माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. यातून अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्येचे वास्तव पुढे आले आहे.
अमरावती विभागातील घटना
जिल्हा - आत्महत्या - मदत - अपात्र - चौकशीत
अमरावती - १७५ - ६५- १० - १००
बुलडाणा - १५६ - २८ - ६० - ६८
वाशिम - ६३ - १६ - ४२ - ५
यवतमाळ - १४३ - ५९ - ६८ - १६
अकोला ७५ - ३३ - ४ - ३८
पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
राळेगाव (यवतमाळ) : शेतातील पीक वाहून गेल्याने चिंतेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वरुड (जहागीर) येथे घडली. अंगद महादेव आडे (६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार घेताना त्याचा रात्री मृत्यू झाला.
या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. तो कर्जाची नियमित परतफेड करत होता. यावर्षी त्यांच्या शेतातील पीक अतिपावसाने वाहून गेले. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, याची चिंता त्याला लागली होती. या विवंचनेतूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.