‘महादीप’च्या अंतिम फेरीत ६१४ विद्यार्थ्यांची भरारी
By अविनाश साबापुरे | Published: March 9, 2024 05:19 PM2024-03-09T17:19:51+5:302024-03-09T17:20:14+5:30
इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. सुरुवातीला शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर परीक्षेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या.
यवतमाळ : खेड्यापाड्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावून चक्क विमानवारी घडविणाऱ्या महादीप परीक्षेची अंतिम फेरी शनिवारी उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत तब्बल ६१४ विद्यार्थ्यांनी मजल मारली. आता यातून गुणवंत ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानवारीसह विविध बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे.
जिल्हा परिषदेतर्फे गेल्या वर्षभरापासून शाळांमध्ये या परीक्षेसाठी लिखित साहित्यासह तयारी करवून घेतली जात होती. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. सुरुवातीला शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर परीक्षेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर दोन फेऱ्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या फेऱ्यांमधून गुणवत्ताप्राप्त ठरलेल्या ६१४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. यामध्ये मराठी माध्यमाचे ५२६ आणि उर्दू माध्यमाच्या ८८ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही जिल्हास्तर परीक्षा शनिवारी दुपारी १२ ते १:३० या वेळेत जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या नियंत्रणात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, उपशिक्षणाधिकारी डाॅ. निता गावंडे, राजू मडावी यांच्या मार्गदर्शनात ही महादीप परीक्षा पार पडली. गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, सचिव डॉ. शितल वातीले, राजकुमार भोयर, अमोल भेदोडकर, अधीक्षक सूरज राठोड, सुनिल कांबळे, शेख जिशान नाजीश, राजहंस मेंढे, शाम माळवे, नदिम पटेल, नागोराव कोमपलवार, महेश सोनेकर, शरद घारोड आदींची उपस्थिती होती.
परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून अंजली नेमा, पल्लवी वानखडे, मिनल राऊत, तृशाली केशवार, नरेंद्र पाटणे, वर्षा मिश्रा, सुचिता राऊत, योगेश चटके, वैशाली वाघचोरे, अश्विनी मुडे, राहुल गुल्हाणे, अमोल पाटील, अविनाश उमप, प्रविणा इंगोले, उज्वला भाविक, अंजली पुराणीक, उज्वला भाविक, पल्लवी नौकरकर यांनी काम पाहिले. कार्यालयीन साधनव्यक्ती सुलोचना राऊत, माधुरी चंद्रे, निलिमा पाटील, समता मेश्राम, ज्योती लांडे, रेखा भगत, आसिया शेख, शगुफ्ता खान, रिजवान अहमद यांनी काम पाहिले.
राज्यात एकमेव ठरला उपक्रम
महादीप परीक्षा हा यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आगळा वेगळा उपक्रम ठरला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अविरत राबविला जात आहे. त्यानंतर किशोर पागोरे आणि आता प्रकाश मिश्रा या शिक्षणाधिकाऱ्यांनीही महादीप उपक्रमासाठी उत्साहाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावून त्यांना पुढील आयुष्यात एमपीएससी, यूपीएससीसाठी तयार करणे हा या परीक्षेचा उद्देश आहे.