६३ हजार नागरिकांना तीव्र पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:11 PM2019-06-02T22:11:03+5:302019-06-02T22:11:27+5:30
उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ लघु प्रकल्प कोरडे पडल्याने पुढील काळात स्थिती आणखी भीषण होण्याची भीती आहे.
मान्सूनची वाट बिकट झाल्याने पावसाचे आगमन जिल्ह्यात लांबणार आहे. पावसाचे आगमन लांबल्याने पाणीटंचाईची स्थिती अधिक भयावह होणार आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
भूजलाची पातळी घसरल्याने वणी तालुक्यातील १०, दारव्हा १९, पुसद १४, नेर १७, यवतमाळ २४, बाभूळगाव ८, आर्णी ३६, दिग्रस ३३, महागाव ४२, केळापूर १, झरीजामणी ४, घाटंजी २२ तर राळेगावमधील ७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. या गावांमधील पाण्याचा साठा संपला आहे. नागरिकांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याकरिता २१० विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर १५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामध्ये बोरडा, तरोडा, पोफाळी, पहूर तांडा, पहूर इजारा, म्हैसदोडका, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रूई, इटोळा, किन्ही, दुधाना, उमर्डा या प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. इतर काही प्रकल्पही शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळे या प्रकल्पांचा जलसाठाही काही दिवसात संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा लांबल्यास जलसंकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.
मृगाच्या पावसाचे वेध
येत्या ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने यावर्षी ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा मृगाकडे लागल्या आहे. मात्र मान्सून लांबणीवर असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केल्याने सर्वच काळजीत सापडले आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही दमदार पावसाची हजेरी झाली नाही. त्यामुळे मृगाकडे सर्वांचे लक्ष आहे.