क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगच्या नावाखाली साडेसहा लाखांचा घातला ऑनलाइन गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:34 PM2023-07-29T12:34:59+5:302023-07-29T12:35:25+5:30
दहा लाखांची मागणी : बदनामीची धमकी
यवतमाळ : व्हॉट्सॲपवर मेसेज टाकून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगसाठी खाते उघडण्यास सांगितले. त्यावर दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगितले. अखेर पैशाची मागणी केली असता शिवीगाळ केली. तसेच तुमच्या घराचा डाटा माझ्याकडे आहे. मला गुमान दहा लाख रुपये द्या अन्यथा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करेल, अशी धमकी देत साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील गिलाणीनगरमधील कृष्णविहार अपार्टमेंटमध्ये राहणारे अरविंद वासुदेवराव झाडे यांनी अवधूतवाडी ठाण्यात फिर्याद दिली. झाडे यांना इंडियन शेअर मार्केटची मागील पाच वर्षांपासून चांगली माहिती असून, ते शहर मार्केटमध्ये ट्रेडिंगही करतात. १ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास ते यवतमाळ येथील घरी असताना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगसंदर्भात मेसेज प्राप्त झाला. शेअर मार्केटसंदर्भातील माहिती असल्याने झाडे यांनीही क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगबाबत उत्सुकता दाखविली व व्हॉट्सॲप मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तुम्ही यामध्ये ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. तसेच याबाबत आमच्या मॅनेजरशी संपर्क करून देतो, असे सांगितले.
त्यानंतर किरण राव नावाच्या व्यक्तीने टेलिग्रामवरून झाडे यांना लिंक पाठवली. तसेच या लिंकवर खाते उघडण्यास सांगितले. झाडे यांनी आपली सर्व माहिती बँक खात्यासह भरून सदर लिंकवर क्रिप्टो खाते उघडले. त्यानंतर ट्रेडिंगच्या नावाखाली वेळोवेळी झाडे यांनी या खात्यावर रक्कम टाकली. अखेर टाकलेली सहा लाख ३१ हजार ८०० रुपयांची रक्कम परत मागितली असता त्यांनी नकार दिला. तसेच शिवीगाळ करीत तुमच्या घराचा डाटा माझ्याकडे आहे. आम्हाला दहा लाख रुपये द्या. अन्यथा तो सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली. अखेर झाडे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली.
म्हणे, १५ मिनिटांत होईल दुप्पट ते तिप्पट रक्कम
अरविंद झाडे यांना क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगचे खाते काढायला लावून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. दोन हजार २३२ आणि पाच हजार ३२ रुपये मर्चंटच्या खात्यावर पाठविल्यास पुढील १५ मिनिटांत ट्रेडिंग होऊन नऊ हजार ८४३ रुपयांचा फायदा तुम्हाला होईल, असे सांगण्यात आले. याच दामदुप्पट आमिषाला बळी पडून झाडे हे या खात्यात पैसे टाकत राहिले. अखेर पैसे परत मागितले असता पुढील अज्ञाताने दमदाटी करीत धमकावण्यास सुरुवात केली.