प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:37 PM2019-04-22T21:37:57+5:302019-04-22T21:38:19+5:30

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.

667 waterfowls for animals | प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

Next
ठळक मुद्दे४० ठिकाणी सौरपंप : वाघांचा वावर असणाऱ्या पाणवठ्यावर कॅमेरे

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, त्यातूनच त्यांची शिकार होऊ नये यासाठी जंगलांमध्ये ६६७ पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पाणवठे सौरपंपाच्या मदतीने भरले जात आहे. इतर ठिकाणी टॅँकर आणि पेयजलाच्या पाईपलाईनाला जोडण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची स्थिती बिकट होत आहे. भूजलस्त्रोतात घसरण होत आहे. गावालगतचे पाझर तलाव कोरडे पडले आहे. जंगलातील नाल्यामध्ये पाणीच नाही. यामुळे वन्यप्राणी धरणाकडे धाव घेत आहे. अशा स्थितीत शिकार होण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने खास खबरदारी घेतली आहे. कृत्रिम पाणवठ्यांच्या निर्मितीसोबत त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी वनव्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. वनरक्षकाचेही त्यावर नियंत्रण राहणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ५८४ चौरस किमीचे आहे. यापैकी दोन हजार १६८ किमीचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. एकूण भूभागापैकी १५ टक्के क्षेत्र हे जंगलात मोडणारे आहे. जंगली भागामध्ये नदी, नाले आणि तलावातील पाणी हे मुख्य स्त्रोत आहे. गतवर्षी ७४ टक्के पावसाची नोंद झाली. यामुळे जंगल क्षेत्रातील पाण्याचे साठे वेळेपूर्वीच कोरडे पडले. या कारणाने जंगली प्राणी पाण्याच्या शोधात वनवन भटकत आहे. अनेक जंगली प्राण्यांनी गावाकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्याच्या जंगलात बिबट, वाघ, तडस, लांडगा, कोल्हा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, वानर, डुक्कर, ससे आणि इतर तृणभक्षी पक्षीही आहेत. या वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्ये २२५ नैसर्गिक पाणवठे आहेत. तर ४०२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
या पाणवठ्यावर टँकर आणि जंगलातून गेलेल्या पाईपलाईनच्या लिकेजवरून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ४० ठिकाणी सौर कृषीपंपाच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी टाकण्याची स्वयंचलित सोय
टिपेश्वर अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठ्यांत पाणी आहे. कृत्रिम पाणवठ्यांवर सौरपंपाच्या मदतीने पाणी वितरण करण्यात येते. सूर्य वर आल्यानंतर ९ ते १० वाजता सौरपंप सुरू होतो. पाणी पाणवठ्यात जमा होते. सूर्य मावळताच सौरपंप बंद होतो. यामुळे अभयारण्यात प्राण्यांसाठी मुबलक पाणी असते. जंगलात वाघाचा वावर असणारे ठिकाण आणि रस्त्यापासून जवळ असणाºया पाणवठ्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणच्या हालचाली वनविभागाला कळणार आहे.

टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यात नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाणी आहे. कृत्रिम पाणवठे मदतीला आहेत. या ठिकाणी सौरपंप जोडण्यात आले आहे. याशिवाय वाघाचा वावर असणाºया ठिकाणी कॅमेरे बसविलेले आहेत.
- प्रमोद पंचभाई
उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग

Web Title: 667 waterfowls for animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.