पदवीधरकरिता ६७.४१ टक्के मतदान
By admin | Published: February 4, 2017 01:04 AM2017-02-04T01:04:12+5:302017-02-04T01:04:12+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६७.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नावे गहाळ : सोमवारी अमरावतीत मतमोजणी
यवतमाळ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६७.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अनेक मतदारांना यादीत नाव नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. यामुळे अनेकांनी संतापही नोंदविला. सोमवारी अमरावतीला मतमोजणी होणार आहे.
अतिशय चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीकरिता जिल्ह्यातील ४८ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यवतमाळ शहरातील १४ मतदान केंद्रांवर दिवसभर प्रचंड वर्दळ होती. अशीच स्थिती जिल्ह्यातील इतर मतदान केंद्रावर होती. मतदारांचे नाव मतदारांना शोधता यावे म्हणून ठिकठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या ठिकाणी मतदारांची आॅनलाईन यादी तपासण्याचे काम पार पाडल्या जात होते.
दुपारच्या सुमारास मतदारांची सर्वाधिक वर्दळ राहिली. दुपारी १२ पर्यंत २५ टक्के मतदान पार पडले होते. तर २ पर्यंत ४५.८६ टक्के मतदान झाले. सायंकाळी ४ पर्यंत २२ हजार २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुसद येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी रांग लागली होती.
मतदारांचे नाव तत्काळ शोेधता यावे म्हणून संंकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले होते. यासोबत ठिकठिकाणी बुथ लावण्यात आले होते. यानंतरही अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत सापडले नाही. यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. याबाबत अनेकांनी संताप नोंदविला.
सोमवारी ६ तारखेला अमरावतीला मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे. यामुळे १३ उमेदवारांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. (शहर वार्ताहर)