रक्तदान शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:03+5:302021-05-07T04:44:03+5:30
दारव्हा : येथील रामरावजी दुधे अध्यापक विद्यालयात शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ७० नागरिकांनी ...
दारव्हा : येथील रामरावजी दुधे अध्यापक विद्यालयात शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ७० नागरिकांनी रक्तदान केले.
उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. शिबिराला प्राचार्य सुरेश निमकर, नगर संघचालक गजानन गाभे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जयंत देशपांडे यांनी तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून कोरोनापासून बचावासाठी शासनाने मोफत लसीकरणाची सोय केल्याचे स्पष्ट केले. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. अशा परिस्थितीत रक्तपेढीमध्ये रक्ताची तातडीची निकड लक्षात घेता नागरिकांनी लस घेण्यापूर्वी एकदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन केले.
सोबतच तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंग महत्त्वाचे आहे. मात्र, तालुक्यातील नागरिक टेस्टिंगसाठी पुढे येत नाही. त्यामुळे येथे जमलेल्या सर्व लोकांनी आपल्या परिसरातील लोकांना टेस्टिंगसाठी प्रोत्साहित करावे. दुसरीकडे १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण सुरू झाले आहे. एकदा का लस घेतली तर काही दिवस रक्तदान करता येत नाही. परंतु, कोरोनासह सिकल्सेल, थॅलेसिमिया आदी आजारात रुग्णांना रक्ताची गरज असते. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यापूर्वी एकदा तरी रक्तदान करण्याचे आवाहन केले. रक्तदान शिबिरात ७० नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. शिबिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमोल शेलोकार, मोहन पांडे, वैभव पांढरकर, साई पापळकर, अजय इंगोले, स्वप्नील निमकर, अक्षय अस्वार, वैभव निमकर, आकाश खंडारे, राजवीर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.