गुरुजी तुम्हीसुद्धा..; यवतमाळ जिल्ह्यात आढळले ७० बोगस शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 11:49 AM2022-03-19T11:49:07+5:302022-03-19T11:54:58+5:30
यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत. अनेकांनी गाव सोडले, तर अनेकांनी आपले टीईटी प्रमाणपत्रही शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी देणे टाळले आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : नोकरीवर लागताना शिक्षकांना कायद्यानुसार स्वत:ची ‘पात्रता’ सिद्ध करावी लागते. मात्र पैशांच्या जोरावर डीएड, बीएड झालेल्या अनेक धनिकांनी पात्रता परीक्षेतही पैसा फेकून नोकरी बळकावली. जिल्ह्यात असे ७० बोगस शिक्षक असल्याची यादी पुणे सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेला दिली आहे. त्यामुळे गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या दोन वर्षातील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत तब्बल ७ हजार ८८८ शिक्षक पैसे देऊन पास झाल्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील ७० शिक्षकांचाही समावेश आहे. आता ही यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत. अनेकांनी गाव सोडले, तर अनेकांनी आपले टीईटी प्रमाणपत्रही शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी देणे टाळले आहे. एकीकडे बडतर्फीची टांगती तलवार तर दुसरीकडे फौजदारी कारवाईची धास्ती, अशा कात्रीत हे बोगस शिक्षक सापडले असून गावकऱ्यांच्या ‘नजरेला नजर’ कशी द्यावी, हाही प्रश्न पडल्याने ‘नालायक’ गुरुजी नातेवाइकांच्या गावात आश्रयाला तर कुणी पर्यटनाला निघून गेले आहेत.
४४ गुरुजींनी लपविले प्रमाणपत्र
- जिल्ह्यात भरतीबंदीच्या काळात साडेसातशे शिक्षकांनी नोकऱ्या मिळविल्या. अशा सर्वच शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शिक्षक परिषदेकडून मागविली गेली.
- जिल्ह्यातील ७० शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी पुणे पोलिसांनी जाहीर केलेली असताना केवळ २६ शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दिली. उर्वरित ४४ शिक्षकांना शोधून काढण्याची जबाबदारी आता शिक्षण विभागाला पार पाडावी लागणार आहे.
बोगस शिक्षकांच्या यादीत जिल्हा झळकला
महाराष्ट्रातील ७ हजार ८८८ बोगस शिक्षकांची यादी पुणे पोलिसांनी खणून काढली. यात सर्वाधिक शिक्षक नाशिक, धुळे, जालना, बीड जिल्ह्यातील आहे. अमरावतीचे दीडशे तर सर्वात कमी भंडारातील ९ शिक्षकांचा यात समावेश आहे. यवतमाळ जिल्हाही यादीत झळकला असून येथील ७० शिक्षकांनी जिल्ह्याला बट्टा लावला आहे.
पुणे पोलीस टीईटी घोटाळा प्रकरणात तपास करीत आहे. गैरप्रकार करून ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची यादी परीक्षा परिषदेकडे आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शिक्षक या यादीत आहेत, याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या येत असल्या तरी अद्याप आमच्यापर्यंत ‘ऑफिशिअली’ काहीही कळविण्यात आलेले नाही. टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी पुण्यातच होत आहे. बोगस शिक्षकांवर काय कारवाई होणार, याचा निर्णय सर्वस्वी परीक्षा परिषदेतच होईल. अजून तरी त्यासंदर्भात आम्हाला कोणतेही निर्देश किंवा यादी प्राप्त झालेली नाही.
- डाॅ. जयश्री राऊत घारफळकर, शिक्षणाधिकारी