‘कोविड’च्या ७० टक्के खाटा रिकाम्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:02+5:30
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. प्रशासनाने आयसीएमआरच्या (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) निर्देशानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, जिल्हा मुख्यालयी कोविड रुग्णालय तयार केले आहे. या सर्वांची मिळून चार हजार ३६ खाटांची क्षमता आहे. त्यापैकी सध्या १२३३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाभरातील कोविडच्या अनुषंगाने एकूण खाटांची संख्या चार हजार ३६ एवढी आहे. आतापर्यंत ३० टक्के खाटा व्यापल्या आहेत. तर ७० टक्के रिकाम्या आहेत. त्यानंतरही आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत असल्याने आर्य व्यक्त केले जाते.
जिल्ह्यात शासकीय कोविड सेंटरमध्ये सध्या तरी खाटांची अडचण नाही. खरी अडचण ही डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, वार्डबॉय आदी आरोग्य यंत्रणेची आहे. यातील जागा मोठ्या संंख्येने रिक्त आहेत. त्याचा फटका आता कोविडच्या या संकटात बसतो आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. प्रशासनाने आयसीएमआरच्या (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) निर्देशानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, जिल्हा मुख्यालयी कोविड रुग्णालय तयार केले आहे. या सर्वांची मिळून चार हजार ३६ खाटांची क्षमता आहे. त्यापैकी सध्या १२३३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहे. एकूण क्षमतेच्या ३०.५५ टक्के रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहे. १४ सप्टेंबरला असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून हे प्रमाण काढले आहे. ७० टक्के खाटा रिकाम्या असल्या तरी आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे.
जिल्ह्यात ३७ कोविड केअर सेंटर आहेत. तेथे दोन हजार ९५६ बेड आहे. सध्या ७९१ रुग्ण तेथे उपचार घेत आहे. एकूण क्षमतेच्या २६.६७ टक्के रुग्ण तेथे आहे. याशिवाय जिल्ह्यात डेडीकेटेड कोविड केअर सेंटर ६ आहे. ५८० बेडची क्षमता येथे आहे. दारव्हा, पांढरकवडा येथील ट्रामाकेअर सेंटरमध्ये तर पुसद शहरात आयुर्वेद महाविद्यालय मेडिकेअर, लाईफ लाईन व पांढरकवडा तालुक्यातील उमरी येथील मिशनच्या रुग्णालयात हे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. सध्या येथे २१६ रुग्ण (३७.२४ टक्के) दाखल आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. तेथे ५०० खाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी २२६ खाटा व रुग्ण आहेत. याची टक्केवारी ४५.२० टक्के इतकी आहे. याशिवाय मेडिकलमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असणाऱ्या १५७ खाटा आहे. ५३ व्हेंटीलेटर आहे. तर इंसेंटीव्ह केअर युनिटची सुविधा असलेले ३० बेड वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. आॅक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी येथे तीन आॅक्सिजन बँक आहे. आता नव्याने प्रस्तावित २६० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डासाठी स्वतंत्र आॅक्सिजन बँकची व्यवस्था केली जाणार आहे. कोविड रुग्णालयातील ४५ टक्के खाटा कोविड रुग्णांनी व्यापल्या आहेत.
ऑक्सिजनसाठी पाच सदस्यीय समिती
जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजनसंदर्भात पाच सदस्यीय स्वतंत्र समिती तयार केली. ही समिती दैनंदिन ऑक्सिजनची गरज, ती पुरवणाऱ्या बॉटलिंग प्लांट, पुरवठादार यांच्या संपर्कात राहणार आहे. या समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आहे. जिल्हा उद्योग अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, समिती अध्यक्ष तथा नोडल अधिकारी यांचाही यामध्ये समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ते कोविड रुग्णालयापर्यंत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी ही समिती काम करणार आहे.