७० हजार शेतकरी वेटींगवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:01 PM2017-10-25T23:01:11+5:302017-10-25T23:01:21+5:30
जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. दरम्यान, बुधवारी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँक अधिकाºयांकडून व्हीसीव्दारे यातील अडचणी समजून घेतल्या.
जिल्हा बँकेचे एक लाख ७९ हजार १५० शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले. त्यांचा अहवाल तब्बल ९७८ फाईलमध्ये शासनाकडे आॅनलाईन सादर करण्यात आला. आॅनलाईनमध्ये यातील ६६४ फाईलच यशस्वीपणे दाखल झाल्या. उर्वरित २५६ फाईल अद्याप वेटींगवर आहे. १० दिवसांपूर्वी फाईल दाखल झाल्यानंतरही ही स्थिती असल्याने बँकेच्या शाखांमध्ये विविध शंकेला उधाण आले. या २५६ फाईलमध्ये ७० हजार शेतकºयांच्या नावाची नोंद आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या दाखल करताना बँक स्तरावर आधार नंबरच चुकीचे नोंदविले गेले. अनेकांचे बँक अकाउंटही चुकविले गेले. यामुळे पुढील महिनाभरात शेतकºयांच्या खात्यात वळत्या होणाºया कर्ज रकमेचा गुंता वाढला आहे.
या बाबीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मुंबईत बैठक घेत बँकांना जाब विचारला. यामुळे कर्जमाफीच्या फेरयाद्या तयार करण्याची नामुष्की बँकावर ओढवण्याचा धोका वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी आयटी विभाग, बँंकर्स व प्रधान सचिवांसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील बँक अधिकाºयांशी ‘व्हीसी’च्या माध्यमातून संपर्क साधला. त्यात त्यांनी बँकांच्या अडचणी समजून घेतल्या. फडणवीस यांनी याद्यांमधील घोळ सर्वांपुढे मांडला. शेतकºयांच्या नावापुढे झिरो-झिरो, एक-एक अथवा एकच नंबर पती-पत्नीच्या नावापुढे नोंदविला गेल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. यामुळे कर्जाची रक्कम बँकेत वळती करताना गोंधळ उडणार असल्याचे लक्षात आले.
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांची नावे बँक स्तरावर जाहीर न करता, ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित अनेक बँका येतात. त्यामुळे काही नावे दोनदा समाविष्ट झाली. या अडचणीही यावेळी निदर्शनास आल्या. यात बँकांनी आयटी विभागाला दोषी ठरविले. फाईल अपलोड करताना ‘एरर मॅसेज’ येतो. दुरूस्त केलेल्या फाईलमध्येही तोच मॅसेज येतो. मात्र ‘एरर’ काय आहे, हे सांगितले गेले नाही, असे बँक अधिकाºयांनी व्हीसीत सांगितले.
नवीन सूचनांकडे लागल्या नजरा
कर्जमाफीच्या याद्या तयार करताना जिल्हा बँकच नव्हे, तर राष्ट्रीयकृत बँकांनीही अशाच चुका केल्या आहे. यामुळे संपूर्ण याद्याच अडचणीत सापडल्या. परिणामी सध्या कर्जमाफीची प्रक्रिया थांबली. या प्रमुख कारणाने बँकांना नवीन याद्या तयार करण्याची सूचना दिली जाण्याची शक्यता बळावली आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण याद्या क्लिअर होतील. ग्रीन झोनमध्ये सर्वच नावे येतील. मर्यादित कालावधीतच हा संपूर्ण कार्यक्रम पार पडेल.
- अमन गावंडे
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक