७० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचा चेंडू ‘आयटी’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:44 PM2018-02-13T21:44:07+5:302018-02-13T21:44:37+5:30
जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे.
रूपेश उत्तरवार ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेकऱ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहे.
मुख्यमंत्र्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. त्याचा ११ फेबु्रवारीला आढावा घेण्यात आला. राज्यातील बँकांची स्थिती सहकार आयुक्तांनी जाणून घेतली. आता ‘मिसमॅच’ खाते आणि काही खासगी बँकांचे अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र आयटी विभागाचा ग्रीन सिग्नल शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. यामुळे येत्या दोन दिवसात सर्व कर्ज खाते निल होईल का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जमाफीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून सहकार विभागाची यंत्रणा झटत आहे. त्यांनी मिसमॅच दस्तावेजाची फेरतपासणी करून मुंबईच्या आयटी विभागाकडे अहवाल पाठविला. आता मुंबईचा आयटी विभाग ग्रीन लीस्ट प्रकाशित करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे वळते होणार आहे. जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जखाते अद्याप क्लिअर झाले नाही. यापैकी तब्बल ६४ हजार खाते मिसमॅच आहे. इतर खात्यातील कर्ज प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँकाकडून पूर्ण केली जात आहे. सहकार विभागाने जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचा अहवाल दुरूस्त करून पाठविला. यामुळे ग्रीन लीस्ट लागताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील. मात्र केवळ दोन दिवसांत हे काम पूर्ण होणे सध्या तरी तारेवरची कसरत ठरणारे आहे.
८९२ कोटींची कर्जमाफी
जिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ९५६ हजार शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज दाखल केले. या खात्यांवर ९४७ कोटी ६१ लाखांचे कर्ज आहे. यातील एक लाख ७७ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ८९२ कोटी रूपयांची रक्कम वळती झाली आहे. ७० हजार शेतकऱ्यांच्या ५४ कोटींच्या कर्जावरील मंजुरीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.