नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:50 PM2018-12-09T21:50:24+5:302018-12-09T21:50:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी २९ मतदान केंद्रांवर ७३.१५ टक्के मतदान झाले. प्रभाग ९ चा अपवाद ...

73 percent voting in Ner Nagar Parishad | नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान

नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे१८ नगरसेवकांचे भाग्य यंत्रबंद : प्रभाग ९ मध्ये राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीने गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी २९ मतदान केंद्रांवर ७३.१५ टक्के मतदान झाले. प्रभाग ९ चा अपवाद वगळता दिवसभर शांततेत मतदान पार पडले.
एकूण १५ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात आठ हजार ५८ पुरुष (७५.१४ टक्के), तर सात हजार १३१ महिला (७१.०२ टक्के) मतदारांचा समावेश आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दुचाकीवर बसून सर्व बुथचा आढावा घेतला. त्यांच्यासह इतर पक्षातील नेतेही दिवसभर शहरात हजर होते. अशोकनगर परिसरात महसूल राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर स्थानिक उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. एसडीपीओ नीलेश पांडे, ठाणेदार अनिल किनगे यांनी वेळीच दक्षता घेत गोंधळ थांबविला.
सकाळपासूनच मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभरात ७३.१५ टक्के मतदान झाले. महिला, वृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद दिला. शहरात एकंदर २९ बुथवर मतदान पार पडले. सहा संवेदनशील बुथवरही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नऊ प्रभागांसाठी १८ नगरसेवकांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. या १८ जागांसाठी ९३ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवार रिंगणात होत्या.
मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र चिंतकुंटलावार, मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी काम पाहिले, तर एसडीपीओ नीलेश पांडे, ठाणेदार अनिल किनगे यांनी बंदोबस्त ठेवला.
आज सकाळी १० वाजता मतमोजणी
नेर नगरपरिषदेसाठी रविवारी २९ ईव्हीएमवर मतदान झाले. तर लगेच सोमवारी १० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. क्रीडा संकुलात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने शहरवासीयांसह जिल्हाभरातील नागरिकांच्या नजरा मतमोजणीकडे लागलेल्या आहेत. दुपारी १२ वाजतापर्यंत नगरपरिषदेवर कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: 73 percent voting in Ner Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.