पश्चिम विदर्भात ७८ ब्रिटिशकालीन पूल; आजही भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:55 PM2020-08-25T23:55:00+5:302020-08-25T23:55:01+5:30

ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे.

78 British-era bridges in West Vidarbha | पश्चिम विदर्भात ७८ ब्रिटिशकालीन पूल; आजही भक्कम

पश्चिम विदर्भात ७८ ब्रिटिशकालीन पूल; आजही भक्कम

Next
ठळक मुद्दे४८ पुलांचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ब्रिटिशांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या वास्तू या दर्जा, गुणवत्ता व वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना ठरल्या आहेत. एकट्या पश्चिम विदर्भात ब्रिटिशकालीन ७८ पुलांची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे.

ब्रिटिशकाळात पूल, इमारती, कारागृह, शासकीय कार्यालये, विश्रामगृह, रेल्वे स्टेशन, रेल्वे पूल, नगरभवन आदींची उभारणी केली गेली होती. यातील बहुतांश वास्तू कार्यान्वित आहेत. कुठे शासकीय कार्यालये सुरू आहेत तर कुठे कारागृहांच्या उत्तुंग इमारतीआत सुरक्षा व्यवस्था अबाधित आहे. ब्रिटिशकाळात बांधलेले चिखलदरा-धारणी (मेळघाट) या थंड हवेच्या ठिकाणाला जोडणारे पूल आजही भक्कम आहेत.

तेथील कायम थंडावा देणारे विशिष्ट पद्धतीच्या बांधणीचे विश्रामगृह वापरात आहेत. ब्रिटिशांनी उभारलेल्या या वास्तू गुणवत्तेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत. आता पूल अथवा इमारती निर्माण झाल्यानंतर लगेच किंवा निर्माणाधीन असतानाच कोसळण्याच्या घटना घडतात. परंतु ब्रिटिशकालीन बांधकामे शंभर-दिडशे वर्षानंतरही उत्तम स्थितीत व वापरात आहेत यातच त्यांच्या बांधकामांची गुणवत्ता दडलेली आहे.

चौपदरीकरणातही ब्रिटिश पूल कायम
ब्रिटिशकालीन इमारतींची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. बहुतांश रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण केले जात आहे. मात्र या सपाट्यातही ब्रिटिशकालीन पूल अनेक ठिकाणी कायम ठेवले गेले आहे.

सर्वाधिक ६३ पूल अमरावती जिल्ह्यात
एकट्या अमरावती विभागात ७८ पूल आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६३ अमरावती जिल्ह्यात आहेत. बुलडाणा १०, अकोला चार तर यवतमाळ येथे एकमेव पूल आहे. वाशिम जिल्ह्यात ब्रिटिशकालीन एकाही पुलाची नोंद नाही. ७८ पैकी ४८ पूल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केले गेले आहे. त्यामधील सर्वाधिक ४० पूल अमरावतीचे तर अकोला, बुलडाणाचे प्रत्येकी एक पूल आहे.

३० पुलांची दुरुस्ती बांधकाम खात्याकडेच
३० पुलांची देखभाल-दुरुस्ती आजही सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यांतर्गत राहेरी येथील ब्रिटिशकालीन पूल वापरास मनाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही केवळ अंतर वाचविण्यासाठी वाहनधारक जीव धोक्यात घालून नियमबाह्यरीत्या या पुलाचा वापर करतात.

यवतमाळच्या पुलाचे आयुष्य १३५ वर्षांचे
यवतमाळहून धामणगाव रेल्वेकडे जाणाऱ्या मार्गावर नांदुरा येथे १८८५ मध्ये ब्रिटिशांनी पुलाचे निर्माण केले होते. १३५ वर्षांपूर्वीचा हा पूल आजही शाबूत आहे. मात्र तो अरुंद असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बाजूला दहा वर्षांपूर्वी दुसरा नवा पूल तयार करण्यात आला आहे. पांढरकवडा रोडवरील मोहदा-करंजी मार्गावर रुंझा येथे ब्रिटिशकालीन अरुंद पूल आहे. त्याच्या नवनिर्माण तथा दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने प्रस्ताव सादर केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ३० पुलांची देखरेख आहे. या पुलांची सातत्याने आवश्यक तेथे डागडुजी केली जाते. ४८ पूल महामार्ग विभागाला हस्तांतरित केले गेले.
- प्रशांत नवघरे
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम यवतमाळ.

Web Title: 78 British-era bridges in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.