३०० किमीच्या पाच राज्य मार्गांसाठी ७९० कोटींचे कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:34 PM2018-07-21T23:34:20+5:302018-07-21T23:35:45+5:30
जिल्ह््यातील पाच प्रमुख मार्गांच्या बांधकाम व देखभाल-दुरुस्तीसाठी ७९० कोटी रुपयांचे कंत्राट मुंबईच्या एका कंपनीला शुक्रवारी मंजूर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह््यातील पाच प्रमुख मार्गांच्या बांधकाम व देखभाल-दुरुस्तीसाठी ७९० कोटी रुपयांचे कंत्राट मुंबईच्या एका कंपनीला शुक्रवारी मंजूर करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने राज्यात रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ‘अॅन्यूईटी’ हा उपक्रम आणला आहे. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३०० किलोमीटर लांबीच्या पाच रस्त्यांसाठी एकत्र निविदा काढण्यात आल्या होत्या. आंध्रप्रदेशातील राव आणि मुंबईच्या ईगल कंपनीने ही निविदा भरली. त्यात इगल सरस ठरल्याने अखेर ७९० कोटींची ही कामे या कंपनीला सोपविण्यात आली.
त्यात यवतमाळ-दारव्हा-वाशिम, शेंबाळपिंपरी-पुसद-माहूर, पुसद-दिग्रस-दारव्हा-नेर, कळंब-घाटंजी, पांढरकवडा-शिबला-झरी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. मुंबईत मुख्यालय व नागपुरात शाखा कार्यालय असलेली ईगल कन्ट्रक्शन कंपनी या मार्गांचे पुढील दोन वर्षात बांधकाम करणार आहे. हे रस्ते सुस्थितीत आणले जाणार आहे. त्यानंतर या मार्गांचे पुढील दहा वर्षेपर्यंत देखभाल-दुरुस्ती याच कंपनीकडे राहणार आहे.
पुसद-वाशिमचा प्रस्ताव
‘अॅन्यूईटी’अंतर्गत पुसद-वाशिम या ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठीही सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा काढल्या होत्या. या निविदासुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.
‘अॅन्यूईटी’अंतर्गत सुरुवातीला प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली गेली होती. परंतु कंत्राटदारांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच ही सर्व कामे एकत्र करून एकच जम्बो निविदा काढली गेली.