आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

By admin | Published: May 31, 2016 11:59 PM2016-05-31T23:59:17+5:302016-05-31T23:59:17+5:30

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या.

8 Municipal Councilors 214 Corporators | आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

Next

सदस्य निश्चित : यवतमाळ पालिकेत राहणार ५६ सदस्य
यवतमाळ : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या. यवतमाळ नगरपरिषदेत सर्वाधिक ५६ सदस्य राहणार असून सध्याच्या नगरसेवकाच्या संख्येत १५ ने भर पडणार आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या निश्चितीचा अहवाल मागविण्यात आला होता. पाठविलेल्या अहवालाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामुळे कुठल्या नगरपरिषदेत किती सदस्य असतील हे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली आहे. किती लोकसंखेला एक सदस्य असावा याचा अहवाल नगरपरिषदेच्या निवडणूक विभागाने पाठविला आहे. या अहवालास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य यवतमाळ नगरपरिषदेचे आहेत. पूर्वी यवतमाळ नगरपरिषदेची सदस्य संख्या ४१ होती. दोन लाख ५१ हजार १२४ लोकसंख्येला ५६ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत १५ सदस्य नगरपरिषदेत वाढणार आहेत.
पुसद नगरपरिषदेच्या ७३ हजार ४८ लोकसंख्येला २९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. वणीमध्ये ५८ हजार ८४० लोकसंख्येला २६ सदस्य असणार आहेत. उमरखेडमध्ये ४७ हजार ४५८ लोकसंख्येला २४ सदस्य निश्चित करण्यात आले आहे. दिग्रस नगरपरिषदेमध्ये ४४ हजार ७६७ लोकसंख्येमागे २३ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. दारव्हा नगरपरिषदेत ३४ हजार ९४ लोकसंख्येमागे २० सदस्य निश्चित झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेत ३१ हजार ५९७ लोकसंख्येला १९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. घाटंजी नगरपरिषदेत २१ हजार ३९३ लोकसंख्येला २० सदस्य निश्चित करण्यात आले आहेत.
यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर सात ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. लोहारा, वडगाव, उमरसरा, वाघापूर, भोसा, मोहा, पिंपळगाव यांचा समावेश आहे. त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती राहणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून होते. आता सदस्य संख्या निश्चित झाल्यानंतर प्रभाग रचनेची उत्सुकता आहे. यावर्षी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. हद्दवाढीने शहराचे राजकीय समीकरण बदलले असून अनेक इच्छुक आपली ताकद आजमाविण्यासाठी तयारी करीत आहे. (शहर वार्ताहर)

जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना
नगरपरिषदांतील सदस्य संख्या २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. आता प्रभाग रचनेसाठीसुद्धा जनगणनेतील प्रगणकाचा आधार घेऊनच केली जाणार आहे. त्यानुसार चक्राकार पद्धतीने त्या-त्या प्रभागातील जागेचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत यावरच विजयाचे गणित अवलंबून असते. या दोनही प्रक्रियेवर इच्छुकांचे बारिक लक्ष आहे. अद्याप तरी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी येत्या काही दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ केली जाणार आहे. त्या दृष्टीकोणातून प्रशासनाची तयारी सुरू आहे.

Web Title: 8 Municipal Councilors 214 Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.