यापुढे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 09:59 PM2018-01-13T21:59:04+5:302018-01-13T21:59:23+5:30

नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नवे जिल्हाध्यक्ष, नव्या महिला जिल्हाध्यक्ष, नवे वर्ष असा नवलाईचा धागा धरून जिल्हा काँग्रेसने आता आपल्या पुढच्या वाटचालीची दिशाही नवीन पद्धतीने ठरविली आहे.

 80 per cent social service, 20 per cent politics | यापुढे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण

यापुढे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण

Next
ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचे नवे सूत्र : काँग्रेसने आपल्याला जे दिले त्यातून उतराई होण्याची वेळ आली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नवे जिल्हाध्यक्ष, नव्या महिला जिल्हाध्यक्ष, नवे वर्ष असा नवलाईचा धागा धरून जिल्हा काँग्रेसने आता आपल्या पुढच्या वाटचालीची दिशाही नवीन पद्धतीने ठरविली आहे. शनिवारी येथे पार पडलेल्या नववर्षाभिचिंतन कार्यक्रमात जिल्ह्यातील धुरंधर काँग्रेसजणांनी ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे सूत्र स्वीकारणार असल्याचे जाहीर करत कार्यकर्त्यांनाही त्याचा अवलंब करण्याची सूचना केली.
काँग्रेसच्या ‘रूटीन’ कार्यपद्धतीला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या संकल्पनेतून ‘नववर्षाभिचिंतन’ हा कार्यक्रम दादासाहेब कोल्हे सभागृहात पार पडला. आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देणाºया व्यक्तींचा सन्मान करत त्यांच्या कार्यातून गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत नवी प्रेरणा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातूनच जिल्हाध्यक्षांनी त्याचे सूतोवाच केले. डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले, हा कार्यक्रम सामाजिक आहे, राजकीय नव्हे. जिल्ह्यात प्रतिभावंतांची कमतरता नाही, त्यांच्या कार्यातून सर्व समाजाला प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. तसेच अन्यायग्रस्तांच्याही पाठीशी पक्ष उभा राहणार आहे. यापुढे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असाच कार्यक्रम असेल. त्यामुळे तालुका काँग्रेसनेही आपापल्या क्षेत्रातील प्रतिभावान लोकांची नावे गोळा करावी. जिल्हा काँग्रेस दरवर्षी अशा सत्काराचा कार्यक्रम करणार आहे.
विशेष म्हणजे, जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या या भूमिकेचाच उपस्थित सर्व मान्यवरांनी पुनरुच्चार केला. त्यात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, श्याम उमाळकर या सर्वांचाच समावेश आहे.
सत्कारमूर्तींनी काँग्रेसला रोड मॅप द्यावा - माणिकराव ठाकरे
कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तर काँग्रेसच्या सामाजिक कार्याची ऐतिहासिक परंपराच विशद केली. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर सध्याच्या काळापर्यंत काँग्रेसने प्रतिभावंतांचा कसा सन्मान केला, याची उजळणी त्यांनी कार्यकर्त्यांपुढे मांडली. आताही सत्कारमूर्तींनी काँग्रेसला सामाजिक कार्याचा विधायक रोड मॅप द्यावा. पक्ष हा समाजापेक्षा वेगळा नसतो. काँग्रेसचा विचारच देशाला पुढे नेऊ शकतो. सत्ता मिळविणे सोपे आहे. पण सर्वांना एका सुत्रात बांधणे हे काँग्रेसशिवाय कुणालाच साध्य झालेले नाही.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, आमदार हरिभाऊ राठोड, महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, डॉ. मोहम्मद नदीम, तातू देशमुख आदींसह एनएसयुआय, राष्ट्रीय सेवा दल, अल्पसंख्यक आघाडीचे पदाधिकारी तसेच सर्व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल गायकवाड, अरुण राऊत यांनी केले.
नव्या-जुन्यांचा सोहळा
याप्रसंगी प्रतिभावंत नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यात मिर्झा बेग, डॉ. दिलीप अलोणे, रामेश्वर खोडे महाराज, अप्पाराव मैंद, भूपेंद्रसिंग कोंघारेकर, न. मा. जोशी, टी. ओ. अब्राहम, प्रकाश नंदूरकर, घाटंजीच्या दिलासा संस्थेच्या विजया धस, सारेगामा स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक पटकावणारे दिग्रस येथील गायक उज्ज्वल गजभार, भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक आणि यवतमाळ-लोहारा येथील रहिवासी आकाश चिकटे आदींना गौरविण्यात आले. तसेच काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सत्कार करताना नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, नांदेडच्या महापौर शिला किशोर भवरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मो. सईद शेख, पुंडलिक दोडके, देवेंद्र चव्हाण, मेजर गौतम कुमार, रामराव घोटेकर, दादाजी पाटील मते, अण्णाभाऊ कचाटे, नरेंद्र मानकर आदींचा सत्कार झाला.

काँग्रेसला जुने चांगले दिवस आणायचे असतील, तर सामाजिक कामातूनच पुढे गेले पाहिजे, हे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांचे वक्तव्य सूचक ठरले.
ज्यांचा येथे सत्कार झाला, ते लोक म्हणजे देशाची ‘थिंक टँक’ आहे. अंगी दिव्यत्व असलेल्या व्यक्तींचे पूजन झालेच पाहिजे, असे म्हणत प्रा. वसंतराव पुरके यांनीही काँग्रेसच्या सामाजीकरणाची सुरूवात झाल्याचे स्पष्ट केले.
त्याच चालीवर अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनीही काँग्रेस ही ‘बेसिक’ पार्टी आहे. देशाच्या एकतेसाठी जे-जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहते, अशी भूमिका मांडली. आजवरच्या राजकारणात ४४ हा ‘लोएस्ट’ आकडा काँग्रेसने गाठला आहे. आता याखाली काँग्रेस येऊ शकत नाही. काँग्रेसने आपल्याला जे दिले, त्यातून उतराई होण्याची वेळ आली आहे.
महिला, युवक, मागासवर्ग, ओबीसी, मुस्लिम, दलित अशा प्रत्येक घटकाचे प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावीपणे मांडले पाहिजे, असे सांगत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनीही कार्यकर्त्यांना ‘सामाजिक’ होण्याचा मंत्र दिला.

Web Title:  80 per cent social service, 20 per cent politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.