वर्षभरात आठ हजार नागरिकांना श्वानदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:15 PM2019-06-26T22:15:30+5:302019-06-26T22:15:53+5:30
जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. जिल्हाभरात श्वानाची संख्या खूप आहे. श्वान विविध कारणांमुळे दिवसेंदिवस हिंसक होत आहे. स्वजातीतील वर्चस्वाच्या लढाईतून श्वानामधील हल्ले वाढत आहेत. जखमी झालेल्या श्वानावर उपचार मात्र होत नाही. उपचाराअभावी जखम चिघळते. यातून श्वान पिसाळण्याची संख्या वाढते. यामुळे श्वानदंशाची संख्या वाढली आहे.
अशा श्वानावर उपचार करणारे पशु वैद्यकीय डॉक्टर गावात फिरताना दिसत नाही. उपचाराअभावी श्वान गावभर सैरभैर होतो. तो वाटेत येईल त्याला चावतो. श्वान चावल्याची जखम अधिक धोकादायक आहे. त्याचे जंतू थेट मानवी शरीरात शिरतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास श्वानदंश झालेला व्यक्ती प्राण्याप्रमाणेच विव्हळतो. यात त्याच्या मृत्यूची संभावना अधिक असते. असे असले तरी श्वानाची काळजी घेतली जात नाही. यातून जिल्ह्यात श्वान चावण्याचे प्रकार वाढले आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अॅन्टी रॅबीजची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अशा घटना घडल्यास गावपातळीवर उपचार शक्य होणार आहे.
जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले
यवतमाळचा भूभाग जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यानंतर या ठिकाणी सर्वत्र हिरवळ पहायला मिळते. या हिरवळीत सापांचा मुक्तसंचार पहायाला मिळतो. यातूनच ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षभरात ३२३ सर्पदंशाची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. यावर मात करणारे अॅन्टी स्नेक व्हेनम औषधाची ट्रिटमेंट त्यावर केली जाते. या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांना पाठविले जाते. यामुळे सर्पदंशनानंतरही रूग्णाचे प्राण वाचले आहेत.
सुधारित इंजेक्शन
पूर्वी अॅन्टी रॅबीज लस पोटात बेंबीच्या बाजूला दिली जात होती. आता यात बदल झाले आहे. सुधारित लसचे इंजेक्शन हातात दिले जाते. ०, ३, ७, १४ आणि २८ दिवसानंतर ही लस दिली जाते. त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उपाययोजना केल्या आहेत.