८१९ पुलांची बांधकाम अभियंत्यांकडून तपासणी
By admin | Published: August 24, 2016 12:48 AM2016-08-24T00:48:04+5:302016-08-24T00:48:04+5:30
महाड दुर्घटनेनंतर सावध झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८१९ पुलांची तपासणी केली
दुरुस्तीचे पाच वर्षांचे नियोजन : पहिल्या टप्प्यात रुंझा, बोरीअरब
यवतमाळ : महाड दुर्घटनेनंतर सावध झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८१९ पुलांची तपासणी केली असून त्यांच्या दुरुस्तीचे पाच वर्षांचे नियोजन केले आहे.
२ आॅगस्टच्या मध्यरात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील महाड शहराजवळ सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या तमाम पुलांची तपासणी आणि आवश्यक असेल तेथे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीची मार्गदर्शकतत्वे १९ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के यांनी महाड दुर्घटनेनंतर लगेच सर्वच प्रकारच्या पूल तपासणीचे काम हाती घेतले. त्यात अडीचशे मीटरपेक्षा अधिक लांबी असलेले तीन, मोठे ६८ आणि छोटे ७४८ अशा एकूण ८१९ पुलांची बांधकाम अभियंत्यांमार्फत तपासणी केली गेली. या पुलांच्या दुरुस्तीचे पुढील पाच वर्षाचे नियोजन केले गेले. यातील आठ ते दहा पुलांची देखभाल दुरुस्ती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. त्यामध्ये पांढरकवडा मार्गावरील रुंझा येथील ६० वर्ष जुना पूल प्राधान्याने हाती घेतला जाणार आहे. दगडाने बांधलेल्या या पुलाला पर्यायी पूल उपलब्ध करून दिला जाणार आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील बोरीअरब येथे अडाण नदीवर ब्रिटीशकालीन पूल आहे. या पुलाची दुरुस्तीसुद्धा पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे.
याशिवाय आणखी सहा ते आठ पूल तातडीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निशाण्यावर आहेत. त्यात पुसद तालुक्यातील दगडाने बांधलेल्या चार पुलांचा समावेश आहे. अन्य पुलांची सुस्थिती असल्याचे सांगितले जाते. तरीही आवश्यकतेनुसार त्यांची देखभाल केली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कुण्या अभियंत्याने किती मीटर लांबीच्या पुलाची तपासणी करावी याची जबाबदारीही निश्चीत करण्यात आली. त्यानुसार मुख्य अभियंत्यांकडे २०० मीटर व त्या पेक्षा अधिक लांबीचे सर्व पूल, अधीक्षक अभियंता यांच्याकडे ६० ते २०० मीटर, कार्यकारी अभियंता ३० ते ६० मीटर तर उपअभियंत्याकडे ३० मीटरपेक्षा कमी लांबीच्या सर्व पूल तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्याकडे केवळ मोऱ्यांची तपासणी दिली गेली.