८२ हजार विद्यार्थी ४०० रूपयांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:16 PM2017-10-26T23:16:09+5:302017-10-26T23:16:19+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास दोन लाख ४१ हजारांच्यावर विद्यार्थी गणवेशाच्या रकमेसाठी पात्र आहेत. आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मात्र यावर्षी गणवेश न देता दोन गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांसह बँकांमध्ये खाते काढले. नंतर वडिलांऐवजी आईसह संयुक्त खाते काढण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आईच्या नावासह संयुक्त खाते काढण्यासाठी धावपळ करावी लागली.
शाळा सुरू झाल्यापासून सतत धावपळ करूनही आत्तापर्यंत एक लाख ५९ हजार ५११ विद्यार्थ्यांच्याच खात्यात प्रत्येकी ४०० रूपयांची रक्कम जमा होऊ शकली नाही. उर्वरित ८२ हजार २२० विद्यार्थ्यांनी अद्यापही खातेच काढले नाही. परिणामी त्यांच्या पलकांना दिवाळी उलटूनही गणवेशाची रक्कम मिळाली नाही. बँकेत खाते काढण्यासाठी त्यांच्या सतत चकरा सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने त्यांचे खातेच निघाले नाही. शासनाच्या तुघलकी निर्णयामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेशाची रक्कम मिळू शकली नाही. बँॅकेत खाते काढण्यासाठी अजूनही त्यांची धावपळ सुरूच आहे.
आधीचीच प्रक्रिया होती बरी
अनेक पालकांनी यापूर्वीचीच प्रक्रिया बरोबर होती, असे मत मांडले. यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेमार्फतच प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मात्र ही पद्धत मोडीत काढून आता ४०० रूपये देण्याचा निर्णय झाला. यापूर्वी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसाठी एकदाच कापड खरेदी करीत होते. त्यामुळे कापड कमी दरात मिळत होता. आता प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळे कापड घ्यावे लागते. त्यामुळे पूर्वीचीच पद्धत योग्य होती, असे अनेक पालकांनी सांगितले.