यवतमाळ जिल्ह्यात ८३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 10:43 AM2021-01-16T10:43:15+5:302021-01-16T10:44:16+5:30
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९२५ ग्रामपंचायतींच्या ८ हजार १०१ जगांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल ८३.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ९२५ ग्रामपंचायतींच्या ८ हजार १०१ जगांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल ८३.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदानासाठी अनेक केंद्रांवर रांग लागली होती. अपवाद वगळता सर्वत्र मतदान पार पडले.
शुक्रवारी सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. दुपारी ३:३० पर्यंत ६२ टक्के मतदान पार पडले.
जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार होती. यातील ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामुळे ९२५ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानवेरीला पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद पणाला लावली होती. एक मत खेचून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळे सायंकाळपर्यंत ८३.१५ टक्के मतदान झाले.
३ हजार ७१ प्रभांगामध्ये ८ हजार ८०१ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी १० हजार ५०० कर्मचारी तैनात होते. निवडणुकीमध्ये कोरोनाग्रस्त मतदारांसाठी अर्धा तासांचा अवधी आरक्षित ठेवण्यात आला होता. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर हँड सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स बंधनकारक करण्यात आले होते. या नियमाचे काही ठिकाणी पालन झाले, तर काही ठिकाणी उल्लंघन झाले.
काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावे चुकल्याच्या तक्रारी यावेळी पुढे आल्या . संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष होते. या ठिकाणाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आर्णी ६६, बाभूळगाव ५०, दारव्हा ७३, दिग्रस ४६, घाटंजी ४९, कळंब ५६, केळापूर ४०, महागाव ७१, मारेगाव ३०, नेर ४९, पुसद ९८, राळेगाव ४६, उमरखेड ७५, वणी ७४, यवतमाळ ६६, तर झरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये महिलांची संख्या अधिक होती. काेरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. विकासाच्या मुद्यावर मतदान पार पडले.
निवडणूक प्रक्रियेत आपल्या पक्षाची बाजू मजबूत व्हावी म्हणून प्रत्येक पक्षाने आपली शक्ती पणाला लावली होती. प्रत्येक गावामध्ये नवख्या उमेदवारांचे पॅनल भाव खाऊन गेले. याशिवाय सरपंचपदाची थेट निवडणूक नसल्याने गावपातळीवर मोठी चुरस पाहायला मिळाली. आपणच सरपंच होऊ, या आशेने प्रत्येक उमेदवार वावरताना पाहायला मिळाला. मतमोजणी सोमवारी होणार आहे. तालुकास्तरावर यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ८:३० पासून मतमोजणीला प्रारंभ होईल. गावात सत्ता कुणाची, यासाठी सोमवारपर्यंत मतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.