जिल्ह्यातील ८३४ बालके कमी वजनाने कुपोषणाच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:08 PM2024-09-12T15:08:18+5:302024-09-12T15:09:03+5:30
Yavatmal : बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुदृढ माता आणि बालकांसाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता बालकांना आणि मातेलाही पौष्टिक खाद्यपदार्थ गाव पातळीवर दिले जात आहेत. यानंतरही जिल्ह्यात ८३४ बालके कुपोषणाच्या छायेत असल्याची बाब पुढे आली आहे. कमी वजनामुळे सौम्य कुपोषणाच्या छायेत असलेल्या या बालकांमुळे आरोग्य यंत्रणेसह बालकांच्या माता-पित्यांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात २६९१ अंगणवाडी आणि बालवाडी आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांची संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. या बालकांच्या आरोग्याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. यासोबतच गावपातळीवर बालकांची विशेष काळजी घेतली जात आहे.
लसीकरण वेळेवर करता यावे म्हणून अंगणवाडीस्तरावर कॅम्प घेतले जातात. यानंतरही कमी वजनाची बालके गाव पातळीवर आढळली आहेत. यामुळे माता- पित्यांना आणि आरोग्य विभागाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.
जन्मतःच हवे अडीच किलो वजन
बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बाळं ही दीड किलो ते काही ग्रॅम वजनाची जन्माला येतात. अशा बाळाची वर्षभर मातेला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा बाळाला काचेतही ठेवावे लागते. अशा बाळांच्या सुदृढ वाढीसाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे.
तीन ते सहा वर्षांच्या बालकांसाठी विशेष आहार
या योजनेत प्रीमिक्स खिचडी, मायक्रो न्यूट्रन्स आणि मूगडाळ, 3 तुरडाळीची खिचडी पॅक दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया केलेले हे पौष्टिक आहाराचे पॅकेट घरपोच दिले जातात. यातून संतुलित वाढ व्हावी हा मूळ उद्देश आहे. महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हा पोषण आहार बालकांना दिला जात आहे. हा आहार जनजागृतीअभावी बाहेर फेकला जातो.
व्हीआयडीसी केंद्राच्या माध्यमातून ९० दिवस लक्ष
जिल्ह्यात कमी वजनाच्या सौम्य कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्हीआयडीसी केंद्रात या बालकांवर उपचार केले जातात. त्यासाठी ९० दिवसांचा विशेष कार्यक्रम आहे. यात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचे वजन वाढ- विण्यावर विशेष भर दिला जातो. वय आणि बालकांची उंची यानुसार त्याचे वजन किती असावे, यावरील आरोग्याच्या निकषांनुसार यात उपाययोजना होतात.
बीपी, शुगर आणि आजारपणाने बाळाचे वजन प्रभावित
गरोदरपणात मातेला बीपी, शुगर अथवा इतर आजार असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. याठिकाणी बाळाचे वजन कमी होण्याचा धोका असतो. अनेकवेळा बाळं वेळेपूर्वी जन्माला येतात. अशी बालके विविध आजारांना बळी पडतात. यातून शारीरिक व्याधी निर्माण होते.