८७५ जागा, ८८ हजार अर्ज अन् आठ कोटींची कमाई; जिल्हा परिषदेची जम्बो भरती
By रवींद्र चांदेकर | Published: September 8, 2023 07:30 PM2023-09-08T19:30:36+5:302023-09-08T19:30:56+5:30
कंपनी मालामाल, बेरोजगारांचे हाल
यवतमाळ : राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या जम्बो भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेतही ८७५ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी ८८ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातून परीक्षा घेणाऱ्या कंपनीला आठ कोटी रुपये मिळाले आहे.
जिल्हा परिषदेच्या ८७५ जागांसाठी २५ ऑगस्टपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, परिचारिका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यीकी, पंचायत, कृषी व शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लेखापाल, अकाऊंटंट, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, फिटर आदी पदांचा समावेश होता. एकूण ८७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. विहित मर्यादेत तब्बल ८८ हजार ७५२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. यात सर्वाधिक अर्ज ग्रामसेवक पदासाठी दाखल झाले आहे.
उमेदवारांनी अर्जासह शुल्कसुद्धा भरले. हजार रुपये आणि ९०० रुपये असे शुल्क ठेवण्यात आले होते. यातून भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीला आठ कोटी दोन लाख १७ हजार १०० रुपये प्राप्त झाले आहे. बेरोजगारांच्या शुल्कातून कंपनीच मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी अनेक उमेदवार बाहेरील जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे. या जागांसाठी संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संबंधित कंपनी भरती प्रक्रियेची पूर्ण अंमलबजावणी करणार आहे.
अनेक वर्षानंतर जिल्हा परिषदेत जम्बो पदभरती होत असल्याने बेरोजगारांच्या नजरा या भरती प्रक्रियेकडे लागल्या आहेत. विविध ३१ पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सर्वाधिक ३७५ पदे आरोग्य सेवक महिलांची आहे. ग्रामसेवकांची १६१ तर आरोग्य सेवक पुरुषांची १०० पदे भरली जाणार आहे.
ग्रामसेवक पदासाठी ३२ हजार अर्ज
ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक ३२ हजार ३०६ अर्ज प्राप्त झाले आहे. आरोग्य सेवक पुरुष पदासाठी १८ हजार २३ तर हंगामी आरोग्य सेवक पदासाठी चार हजार १८ अर्ज दाखल झाले आहे. औषध निर्माण अधिकारी पदासाठी १७६४ अर्ज कंपनीला प्राप्त झाले आहे. ८८ हजार ७५२ अर्जांपैकी अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे २० हजार ३१९, अनुसूचित जमाती उमेदवारांचे ११ हजार ६८७, व्हीजे (ए)चे ३०३१, एनटी (बी)चे २०७२, एनटी (सी)चे ३३९६, एनटी (डी)चे ३१५७ अर्ज प्राप्त झाले आहे.
ओबीसी उमेदवारांचे सर्वाधिक अर्ज
८७५ जागांसाठी ओबीसी प्रवर्गातील तब्बल २६ हजार ४०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. विशेष मागास प्रवर्गातील ६८१ उमेदवारांनी तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नऊ हजार २०० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. याच जागांसाठी खुल्या प्रवर्गातील आठ हजार ८०७ उमेदवारांनीही अर्ज सादर केले आहे.
एका जागेसाठी १०१ दावेदार
जिल्हा परिषद ८७५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे सरासरी एका जागेसाठी तब्बल १०१ उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांमध्ये काट्याची लढाई होणार आहे. यात सर्वाधिक गुण प्राप्त करून मुलाखतीसाठी पात्र ठरावे लागणार आहे. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतरच १०१ पैकी एकाच उमेदवाराला नोकरीची संधी मिळणार आहे.