मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 10:04 AM2020-03-04T10:04:22+5:302020-03-04T10:07:00+5:30

कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.

That 90 'days' of fear of death | मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

Next
ठळक मुद्देयवतमाळच्या विद्यार्थिनीचा शहारे आणणारा अनुभव कोरोनाच्या संकटातून सुखरूप परतली

संतोष कुंडकर/देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आम्ही १९ दिवस अक्षरश: बंदिवासात होतो. कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र सुदैवाने आम्ही या आजारापासून वाचलो. मात्र मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून चिंचमंडळमध्ये परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ या लहानशा गावातील स्रेहल मोरेश्वर चटकी ही विद्यार्थिनी वुहानपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. स्नेहलने सांगितले की, जानेवारी महिन्यात चीनमध्ये अचानक कोरोना या जीवघेण्या आजाराचा उद्रेक झाला. शेकडो लोकांना त्याची बाधा झाली. यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खोलीच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. २४ तास तोंडाला मास्क लावून ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. भारतीय माध्यम व समाजमाध्यमावर याविषयात अतिशय चुकीची माहिती पसरविण्यात येत होती. भारतात कोरोनाबद्दल जे वातावरण तयार केले जात होते, तसे तेथे काहीही नव्हते. हा आजार पसरू नये, याची काळजी चीन सरकारकडून घेतली जात होती. नागरिकांना या आजाराची बाधा होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य खाण्या-पिण्याच्या वस्तू घरपोच दिल्या जात होत्या.

कोरोनाच्या रुग्णाला ठार मारताहेत ही अफवाच
वुहानमधील कोरोनाच्या संकटातून सुखरुप बाहेर पडलेली स्नेहल चटकी म्हणाली, कोरोनाच्या रूग्णाला गोळ्या घालून ठार मारण्यात येत आहे, अशा बातम्या भारतीय समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात त्या अफवा ठरल्या. कारण तेथील सरकारने असे काहीही केले नाही. उलट सर्वांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. चीनवरून निघाले तेव्हा माझ्यासोबत महाराष्ट्रातील ३४ विद्यार्थी होते. आम्ही सर्व मिळून ५०० जण होतो. त्यात काही कुटुंबांचाही समावेश होता. यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्नेहलने सांगितले.
विद्यापीठात आम्हाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथे देखील अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. या काळात मी आईवडिलांच्या संपर्कात होतेच. मला आईवडिलांकडून लवकर परत येण्याचा आग्रह सुरू होता. परंतु खबरदारी म्हणून आम्हाला सोडण्यात येत नव्हते.
अखेर आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क केला. त्यानंतर काळजीपूर्वक आम्हाला २ फेब्रुवारीला चीनमधून विमानाने दिल्लीत आणण्यात आले. याठिकाणी तब्बल १६ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आम्ही राहिलो. दिवसभरात अनेकदा आमच्या तपासण्या करण्यात येत होत्या. अखेर १९ फेब्रुवारीला सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आमची दिल्लीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर मी सुखरुप घरी पोहचले. मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते, याची खात्री पटल्यानंतर चीनमध्ये मांसाहार करणे बंद झाले. अंडेही कमी प्रमाणात खायला देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. वरोरा येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१८ मध्ये स्रेहलने चीनमधील हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला होता. तिचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचा व्यवसाय सांभाळतात. आई शालिनी गृहिणी आहे, तर भाऊ नीरज नागपूर येथे शिक्षण घेत आहे.

Web Title: That 90 'days' of fear of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.