आर्णी शाखेतून 25 खातेधारकांचे 92 लाख गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:00 AM2021-03-17T05:00:00+5:302021-03-17T05:00:02+5:30
आर्णी शाखेत १९ हजार ५०० ग्राहकांची बँक खाती आहेत. त्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. रक्कम गहाळ झालेल्यांमध्ये शेतकरी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. कित्येकांच्या पेन्शन खात्यातून रकमा गहाळ झाल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील एका संस्थानिक तथा कंत्राटदाराच्या खात्यातून चार लाख रुपये गहाळ करण्यात आले.
हरिओम बघेल
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतून २५ ग्राहकांच्या खात्यातील सुमारे ९२ लाख रुपये गहाळ असल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या शाखेतील गैरव्यवहार पुढे येताच मंगळवारी नागरिकांनी आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी एकच गर्दी केली होती.
जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या बँकेतील लाखो रुपये परस्पर दोन टक्के व्याजदराने व्यापारपेठेत दिले जात होते. या शाखेत कर्ज वसुली, निराधारांचे अनुदान, शिष्यवृत्तीची रक्कम आदींमध्येही सुमारे चार कोटी रुपयांचा घोळ असल्याचा संशय आहे. सोमवारी काही ग्राहक बँकेत आले असता, त्यांना खात्यातील रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी आर्णी शाखेतील खातेदारांना खात्यातील रक्कम तपासून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, मंगळवारी सकाळी आर्णी शाखेत ग्राहकांची एकच झुंबड उडाली. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती. त्यापैकी २५ ग्राहकांच्या खात्यातून एकूण सुमारे ९२ लाखांची रक्कम गहाळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या ग्राहकांनी लगेच आर्णी शाखेचे व्यवस्थापक आर.एम. गिरी यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. काहींनी थेट आर्णी पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्याची तयारी चालविली.
आर्णी शाखेत १९ हजार ५०० ग्राहकांची बँक खाती आहेत. त्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. रक्कम गहाळ झालेल्यांमध्ये शेतकरी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. कित्येकांच्या पेन्शन खात्यातून रकमा गहाळ झाल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील एका संस्थानिक तथा कंत्राटदाराच्या खात्यातून चार लाख रुपये गहाळ करण्यात आले. अनेक केसेस सुकळी गावातील असल्याचेही सांगण्यात येते. एक शिक्षक खातेदार जानेवारी महिन्यात १२ हजार रुपये काढण्यासाठी धनादेश घेऊन गेला असता त्या क्रमांकाच्या धनादेशावर पूर्वीच २४ जानेवारी २०२१ रोजी चार लाख रुपये काढल्याचे आढळून आले. गाजावाजा होताच २५ जानेवारीला दुसऱ्याच दिवशी ही रक्कम ‘जैसे थे’ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. एका सुरक्षा रक्षकाच्या वहिनीची सात लाख रुपयांची रक्कम गहाळ असल्याचे सांगितले जाते.
शेती विक्रीचे साडेआठ लाख गहाळ
सोमवारी शेतकरी पिता-पुत्र, सेवानिवृत्त शिक्षक व इतर काहींच्या खात्यातून रकमा गहाळ झाल्याचे आढळून आले होते. अली मोहम्मद बरकत अली सोलंकी (रा. शास्त्रीनगर, आर्णी) हे त्यापैकीच एक. त्यांनी ११ लाख ५० हजारांत शेती विकून ती रक्कम जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत त्यांनी जमा केली. सोमवारी तपासणी केली असता, त्यातील साडेआठ लाख रुपये गहाळ असल्याचे निदर्शनास आले. त्यांनीही बँक व्यवस्थापकांकडे सादर केली. या प्रकरणात बँक रक्कम पूर्ववत खात्यात जमा करते का, याकडे नजरा आहेत. तसे न झाल्यास आर्णी पोलीस ठाण्यात बँकेविरुद्ध डझनावर तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून बँक बॅलन्स तपासण्यासाठी आणखी गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
डिपॉझिट तोडले
आर्णी तालुक्यातील परसोडा येथील गोपाल मधुकर सलगर यांचे आर्णी शाखेत फिक्स डिपॉझिट आहे. ते आज रक्कम तपासण्यासाठी आले होते. शाखेत रक्कम सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी आपले डिपॉझिट तोडले. १२ हजारांचे नुकसान झाले, मात्र नाईलाज आहे, असे त्यांनी सांगितले. अशाच पद्धतीने इतर काही ग्राहकांनी मंगळवारी आर्णी शाखेतून पैसे काढले.
चार सदस्यीय चमूकडून लेखापरीक्षण सुरू
आर्णी शाखेतील गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेता, जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने त्रयस्थ सीएमार्फत ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई येथील सीए गुंजन शहा यांच्या कंपनीला ही जबाबदारी सोपविली गेली. त्यांचे बंधू हिमांशु शहा हे या कंपनीचे नियंत्रण करतात. त्यांच्या नेतृत्वात मंगळवारपासून चार सदस्यीय चमूने आर्णी शाखेतील व्यवहारांचे लेखापरीक्षण सुरू केले. या लेखापरीक्षण अहवालाकडे सर्वांच्या नजरा आहेत.
सात वर्षांपूर्वीचे पाच लाखांचे अग्रीम अद्याप भरले नाही
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतून सात वर्षांपूर्वी पाच लाख रुपयांची रक्कम कार्यालयीन अग्रीम या नावाने उचलण्यात आली. आजपर्यंत ती भरली गेली नाही. एका संचालकासाठी ही रक्कम उचलली गेल्याचे बोलले जाते. गेल्या सात वर्षातील ऑडिटमध्ये हा मुद्दा कुणाच्याच कसा लक्षात आला नाही, असा प्रश्न आहे. यामागील ‘रहस्य’ गुलदस्त्यात आहे. त्यावेळी पाच लाख अग्रीम देणारा तो कर्मचारी कोण याची चर्चा आहे. या प्रकरणात तो अडचणीत येण्याची चिन्हे आहे.
महिलेला अश्रू अनावर
बँक खात्यातील बॅलन्स तपासणीसाठी एक महिला आर्णी शाखेत आली. खात्यातून रक्कम गहाळ असल्याचे सांगण्यात आले. ही बाब कळताच या महिलेला अश्रू अनावर झाले. बरबाद झाले, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली.