सन्मानधन योजनेसाठी राज्यातील ९४ लाख शेतकरी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:30 PM2019-07-16T14:30:55+5:302019-07-16T14:33:14+5:30
सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. केंद्र शासनाला दरवर्षी राज्याकडे पाच हजार ६४० कोटी रूपये वळते करावे लागणार आहे. याचा सर्वाधिक लाभ औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांना होणार आहे.
या योजनेत प्रारंभी छोटेच शेतकरी होते. आता मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला. या निकषा नुसार शेतकऱ्यांची निवड करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात एक कोटी ७९ लाख शेतकरी खातेधारक आहेत. त्यांच्याकडे एक कोटी ४७ लाख हेक्टर शेतजमीन आहे. यातील ८५ लाख शेतकरी अपात्र ठरले. ९४ लाख ५४ हजार २६४ शेतकऱ्यांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम जिल्हास्तरावर केले जात आहे. ९१ टक्के शेतकऱ्यांची नावे आॅनलाईन करण्यात आली आहे. दोन हजार रूपये मदतीचा पहिला टप्पा राज्याकडे वळता झाला आहे. दुसरा टप्पा वळता व्हायचा आहे.
औरंगाबाद विभागात ४७ लाख ५३ हजार ८२० शेतकरी खातेधारक आहेत. यातील २४ लाख ५२ हजार ३३६ शेतकरी योजनेत पात्र ठरले आहे. इतर विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. तर सर्वात कमी लाभार्थी कोकण विभागातील आहे. या विभागात २१ लाख २५ हजार ९३३खातेधारक आहेत. यातील सहा लाख ४० हजार ९४६ शेतकरी खातेधारक पात्र ठरले आहेत.
असे आहेत जिल्हानिहाय पात्र शेतकरी
पालघर एक लाख ७ हजार, रत्नागिरी दोन लाख दोन हजार, रायगड एक लाख २१ हजार, सिंधुदुर्ग एक लाख २७ हजार, ठाणे ८३ हजार ४३३, सातारा चार लाख ५८ हजार, पुणे चार लाख एक हजार, सोलापूर पाच लाख ७४ हजार, कोल्हापूर ४ लाख ३० हजार, सांगली तीन लाख ९५ हजार, अहमदनगर सहा लाख ५८ हजार, जळगाव चार लाख ५१ हजार, नाशिक चार लाख ५४ हजार, धुळे दोन लाख ३६ हजार, नंदुरबार एक लाख २९ हजार, औरंगाबाद तीन लाख सात हजार, नांदेड तीन लाख ९१ हजार, जालना दोन लाख ९० हजार, परभणी दोन लाख ६८ हजार, बिड चार लाख एक हजार, उसमानाबाद दोन लाख ४८ हजार, हिंगोली दोन लाख नऊ हजार, लातूर तीन लाख ३३ हजार, बुलडाणा तीन लाख ३५ हजार, वाशिम एक लाख ५६ हजार, यवतमाळ दोन लाख ७५ हजार, अमरावती दोन लाख ८४ हजार, अकोला एक लाख ७५ हजार, नागपूर एक लाख ७३ हजार, वर्धा एक लाख ३६ हजार, भंडारा एक लाख ५४ हजार, गांदिया एक लाख ७४ हजार, चंद्रपूर दोन लाख नऊ हजार, गडचिरोली एक लाख २३ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
८५ लाख शेतकरी अपात्र
शासकीय नोकरी आणि राजकीय पदावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी न करण्याच्या सूचना आहेत. यानुसार राज्यातील ८५ लाख दोन हजार ८०९ शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत.