स्टेट बँकेची ९५ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:54 PM2018-01-23T23:54:10+5:302018-01-23T23:54:37+5:30
खोटे दस्तावेज तयार करून मालमत्तेचे अधिक मूल्यांकन दाखवत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लोहारा शाखेतून तब्बल ९५ लाख रुपयांची उचल केली गेली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोन वकीलांसह चौघांवर लोहारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खोटे दस्तावेज तयार करून मालमत्तेचे अधिक मूल्यांकन दाखवत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लोहारा शाखेतून तब्बल ९५ लाख रुपयांची उचल केली गेली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोन वकीलांसह चौघांवर लोहारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हनुमंत रंगराव कासावार (३९), मृतक सुनील मुकुंद कासावार या दोघांनी २० मे २०१५ रोजी मालमत्तेसंदर्भातील खोटे दस्तावेज तयार केले. त्यासाठी वणीतील अॅड.ज्ञानेश्वर कातकडे, अॅड.नीलेश महादेव चौधरी यांची मदत घेतली. या वकीलांनी मालमत्तेसंदर्भातील खोटे मूल्यांकन प्रमाणपत्र तयार करून दिले. त्या आधारावर स्टेट बँकेच्या दारव्हा रोड शाखेतून कासावार यांनी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक रवींद्र तुकाराम बर्गी यांनी पोलिसांत तक्रार दिली.
तक्रारीवरून चारही आरोपींविरूद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार फुसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लोहारा पोलीस करीत आहे. यापूर्वीही याच पद्धतीने चारही आरोपींनी वणीच्या एका बँकेची फसवणूक केली होती. तेथेही या चौघांवर गुन्हा नोंद आहे.