पुसद उपजिल्हा रुग्णालयात ९५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:19+5:302021-03-27T04:43:19+5:30
पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रात २६ मार्चपर्यंत चार हजार ९२५ जणांना ५६ सत्रांत लस देण्यात ...
पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रात २६ मार्चपर्यंत चार हजार ९२५ जणांना ५६ सत्रांत लस देण्यात आली. केंद्राने ९५.५ टक्के लसीकरणाची लक्ष्यपूर्ती केली आहे.
सध्या इंटरनेटच्या लो स्पीडमुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. प्रारंभी आरोग्य विभागातील कर्मचारी, फ्रंटलाइन वॉरियर्स यांना डोस देण्यात आला. तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक, ४५ वर्ष आणि व्याधीग्रस्त असलेल्यांना १ मार्चपासून लस देण्यास सुरुवात झाली.
आतापर्यंत चार हजार ९२५ जणांना लस देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट लो-स्पीडमध्ये चालत असल्याने ऑनलाईन नोंदणी करण्यास वेळ लागत आहे. नोंदणीशिवाय लस देता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कोविड लसीकरणाला जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयाशिवाय पाच खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोविड शिल्ड लस देण्यात येत असून दुसरा डोस ४५ ते ६० दिवसांत घ्यावा लागतो. लसीकरणानंतर प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन आवश्यक आहे. येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्ष आणि त्यावरील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येईल. यासाठी कॉमोरबीडीटीची अट काढून टाकल्याची माहिती डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी दिली.