हक्काच्या घरकुलासाठी ९५२ कुटुंब १७ वर्षांपासून प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:50+5:302021-07-09T04:26:50+5:30
प्रकाश सातघरे दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे ...
प्रकाश सातघरे
दिग्रस : १७ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी मध्यरात्री पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटला. यामुळे धावंडा नदीची पाणी पातळी वाढून महापूर आला होता. त्यात १४ निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. ९५२ कुटुंब बाधित झाले होते. त्या सर्वांना अद्याप घरकुलाची प्रतीक्षा आहे.
महापुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी, मुलगा वैभव असे एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते असे एकूण १४ जण वाहून गेले होते. मध्यरात्री अचानक आलेल्या महापुरात कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीसह १४ जणांचे निष्पाप बळी गेले होते.
महापुरात अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र अनेकांना अद्यापही हक्काचे घरकुल मिळाले नाही. महापुरानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करून ९५२ कुटुंबांच्या घरकुलासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून शहरातील भवानी माता मंदिर मार्गावर ९५२ घरांसाठी जागा घेऊन घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. तेथे अंदाजे ४३० घरे बांधण्यात आली. मात्र, कमिशन खोरीमुळे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने आज ते घरकुल जीर्ण अवस्थेत आहेत. लाभार्थी त्या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही.
बॉक्स
पूरग्रस्तांमध्ये अद्याप दहशतीचे वातावरण कायम
१७ वर्षांपासून धावंडा नदीकाठी ९५२ घरकुल लाभार्थी मोडक्या झोपड्यात संसार थाटून आहेेत. या परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न आहे. ९ जुलै २००५नंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी मुसळधार पावसामुळे धानंडा नदीला पूर आल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले होते. आजही पावसाळ्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते.