महिला बँक संचालक, अधिकारी यांनी केला ९७ कोटींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:57 PM2023-06-14T13:57:17+5:302023-06-14T13:58:29+5:30
चौकशीतील वास्तव : प्रशासक करणार रकमेची वसुली
यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला. यानंतर ही बँक अवसायनात निघाली. बँकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने २५ नोव्हेंबर २०२२ला ॲड. आर. बी. खोंड यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यांनी कलम ८८ नुसार बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांकडून ९७ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीबाबत जबाबदारी निश्चित केली आहे. यामुळे अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी जिल्हा उपनिबंधकांना संचालक आणि अधिकाऱ्यांकडून वसुलीचे आदेश काढले आहे.
प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कायदा कलम ८८ (१) आणि नियम १९६१ चा नियम ७२ (६) नुसार २० मे २०२३ रोजी आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार बँकेस झालेल्या ९७ कोटी दोन लाख १७ हजार ७५८ रुपयांच्या आर्थिक नुकसानीबाबत बँकेचे संचालक आणि अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी निश्चित केली आहे.
कायदा कलम ९८ ‘ब’नुसार निबंधकांनी कायदा कलम ८८ (१) अन्वये प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने कलम ८८ खाली नुकसान भरपाईसाठी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर, जमीन महसुलाची थकबाकी वसूल करण्याबाबत त्यावेळी जो कायदा व जे नियम अमलात असतील त्या कायद्यानुसार आदेशाची अमलबजावणी करता येईल. यानुसार आदेश पारित करण्यात आला. २९ मे २०२३ला सहकारी संस्था अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी जबाबदारी निश्चित केलेल्या व्यक्तींकडून १५ टक्के व्याजासह कर्ज दिनांकापासून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहे.
अशी होणार रकमेची वसुली
अपचारी व्यक्तीचे नाव - हुद्दा - जबाबदारीची रक्कम
विद्या शरद केळकर - अध्यक्ष - ५५,१०,३६,२२४
गीता अशोक मालीकर - संचालिका - १५,००,०००
शोभा मारोतराव बनकर - संचालिका - १५,००,०००
उषा अरविंद दामले - संचालिका - १५,००,०००
प्रणिता प्रमोद मुक्कावार - संचालिका - १५,००,०००
प्रणिता किशोर देशपांडे - संचालिका - १५,००,०००
सुशीला उत्तमराव पाटील - संचालिका - १,००,००,०००
अनुराधा निरज अग्रवाल - संचालिका - १५,००,०००
सुजाता विलास महाजन - मुख्य कार्यकारी अधिकारी - २५,०१,८१,५३४
राजश्री प्रदीप शेवळकर - उपसरव्यवस्थापक - ५,००,००,०००
शीला पांडुरंग हिरवे - उपव्यवस्थापक - ५,००,००,०००
जया अनिल कोषटवार - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,०००
मंजुश्री शशांक बुटले - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,०००
पौर्णिमा गिरीश गिरटकर - कनिष्ठ अधिकारी - १,००,००,०००
सुरेखा रामेश्वर गावंडे - कनिष्ठ अधिकारी - १,००,००,०००
शीतल मंगेश पांगारकर - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,०००
एकूण रक्कम - ९७,०२,१७,७८५
राज्याचे सहकारी संस्थाचे अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी संचालक आणि अधिकाऱ्यांकडून ९७ कोटी दोन लाख १७ हजार ७८५ रुपये वसुलीचे आदेश जारी केले आहेत. यानुसार संचालक आणि अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी नोटीस बजावल्या जाणार आहेत.
- नानासाहेब चव्हाण, अवसायक, महिला बँक