बाबाजी दाते महिला बॅंकेच्या अधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
By सुरेंद्र राऊत | Published: February 18, 2024 08:30 PM2024-02-18T20:30:11+5:302024-02-18T20:30:31+5:30
तारण ठेवलेली मालमत्ता केली कर्जमुक्त : जिल्हा उपनिबंधकाने संगनमत करुन फसवणूक केल्याचा ठपका.
यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅक डबघाईस आली आहे. बॅंकेचा एनपीए वाढल्याने या बॅंकेच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध घातले आहे. सोबतच येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. या अवसायकानेच दहा कोटीच्या तारण मालमत्तेला कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बॅंकेच्या माजी उपाध्यक्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकासह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब सयाजीराव चव्हाण (४०), अनुपमा आनंदराव जगताप (६०), अतुल आनंदराव जगताप (४५), सचिन साहेबराव जगताप (४५) तिघे रा. शिवाजीनगर यवतमाळ, राजेंद्र लक्ष्मण वरटकर (५३) रा. भाग्योदय सोसायटी वडगाव असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहे. मे.एजी जगताप फर्म यातील तीन भागीदार व दिवंगत आनंदराव जगताप यांनी बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेकडून दहा कोटींचे कर्ज घेतले होते. त्यासाठी मालमत्ता तारण ठेवली होती. बॅंकेकडे भोसा ता. महागाव जि. यवतमाळ, कोसदनी ता. आर्णी जि. यवतमाळ येथील शेतजमीन बॅकेकडे तारण ठेवली होती. मात्र, ही तारण शेती परस्परच जिल्हा उपनिबंधक यांनी संगनमत करून कर्जमुक्त केली. जगताप यांच्या वतीने सहकार न्यायालय अमरावती येथे दावा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात अवसायकाचे सल्लागार ॲड. राहुल शेंद्रे यांनी अवसायकांना कुठलाही सल्ला दिला नाही. असे असतानाही अवसायकांच्या निर्देशावरून हा खटला मागे घेण्यात आला. अतिशय महत्वाच्या टप्प्यावर सहकार न्यायालयात हा खटला आलेला असताना बेकायदेशीररीत्या तो मागे घेण्यात आला. राजेंद्र वरटकर यांना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्र देऊन माईंदे चौक शाखेतील कर्जदार सचिन जगताप यांनी उचल केलेले १ कोटी २० लाखांचा बोझा कमी करायला लावला. तसेच कर्ज खात्याला गहाण असलेले स्थावर मालमत्ता रिलीज करुन देण्याबाबतचे लेखी पत्र दिले. मे.एजी जगताप भागीदाराच्या फर्मची तारण मालमत्ता कर्जमुक्त करण्याचा लेख करून दिला. हा सर्व प्रकार संगनमताने करण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. बॅंकेकडे या फर्मचे लोहारा येथील तीन प्लॉट, शिवाजीनगर येथील घर, कोसदनी ता. आर्णी व भोसा ता. महागाव येथील शेतजमीन तारण ठेवण्यात आली होती. जवळपास १० कोटी रुपये किमतीची ही मालमत्ता संगनमताने कर्जमुक्त करण्यात आल्याचा आरोप बॅंकेच्या माजी उपाध्यक्ष मनीषा कुळकर्णी यांनी तक्रारीतून केला आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी जिल्हा उपनिबंधकांसह पाचजणाविरोधात कलम ४२०, ४६८, ४७१, ४७४, ३४, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
महिला बॅंकेच्या संदर्भातील अनेक तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे येथे मोठ्या प्रमाणात अडकले आहे. आता अवसायक नियुक्त केल्यानंतर हा नवीन गंभीर प्रकार पुढे आला आहे. कोट्यवधी रुपयांची अफरातफर असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीचेही गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेत तपासात आहे.