नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह २४ नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:07 PM2022-12-15T20:07:26+5:302022-12-15T20:09:15+5:30
येथील नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाविरोधात सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली.
संतोष कुंडकर
वणी : येथील नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाविरोधात सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हे नोंद करून चौकशीचे आदेश देताच, वणी पोलिसांनी गुरूवारी माजी नगराध्यक्ष तारेंद्रे बोर्डे, तत्कालिन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्यासह २४ नगरसेवकांविरूद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाई चांगलीच खळबळ उडाली आहे. वणी नगरपरिषदेने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.
या सभेच्या सूचनापत्रात पाच विषयांवरील ठराव पारित करण्याबाबत चर्चा करण्याचे नमूद केले होते. परंतु नंतर ही सभा रद्द करण्यात आली. त्यानंतर हिच सभा ३ मार्च २०१८ रोजी वणी नगर परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत पाच विषयांवरील ठराव पारित होणार होते. परंतु ३ मार्चच्या सभेत दोन विषय अतिरिक्त टाकण्यात आले. हे ठराव बेकायदेशीर व नागरिकांची फसवणूक करणारे असल्याचा आरोप रविंद्र कांबळे यांनी केला होता. त्यानंतर कांबळे यांनी रितसर अर्ज करून सभेच्या कामकाजाच्या व त्याअनुषंगाने पारित केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत मागितली होती. त्यात ठराव क्रमांक ३ व ७ पारित करताना कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.
या प्रकरणी त्यांनी वणीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका दाखल केली. वणी न्यायालयाचे न्यायाधिश सुधीर बोमिडवार यांनी या याचिकेवर निकाल देताना याप्रकरणी गुन्हे करून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वणी पाेलिसांना दिले होते. त्यावरून वणी पोलिसांनी माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तत्कालिन मुख्याधिकारी संदीप बोरकर, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नितीन चहाणकर,वर्षा खुसपुरे, संतोष डंभारे, मंजुषा झाडे, धनराज भोंगळे, प्रीती बिडकर, राकेश बुग्गेवार, संगीता भंडारी, मनीषा लोणारे, प्रशांत निमकर, ममता अवताडे, आरती वांढरे, शहानूरबी अ गफ्फार, पांडुरंग टोंगे, अक्षता चौहान, विजय मेश्राम, माया ढुरके, स्वाती खरवडे, संतोष पारखी, रंजना उईके, सुभाष वाघाडकर, महादेव खाडे, धीरज पाते, यांच्याविरूद्ध कलम ४६६, ४६८, ३४ अन्वये गुन्हे नोंद केले आहे.