नायलॉन मांज्याने चिरला चिमुकल्याचा गळा, यवतमाळातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:24 PM2023-11-21T13:24:06+5:302023-11-21T13:24:21+5:30
बंदी असताना चायनीज मांजाची सर्रास विक्री
यवतमाळ : चायनिज मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याची विक्री होत आहे. या प्रकाराने चिमुरड्याचा गळा चिरल्या गेल्याची घटना यवतमाळात घडली. जैन रफिक मवाल (५) असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या गळ्याला चीर पडल्याने गंभीर दुखापत झाली.
जैन हा आपला काका वसिम मवाल यांच्या सोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्ये जात होता. दरम्यान, नागपूर रोडवरून स्टेट बँक चौकाकडे जात असताना गणेश चौकात ही घटना घडली. नायलॉनचा मांजा कुठून तरी उडून या दुचाकीवर आला आणि समोर बसलेल्या जैनच्या गळ्याला अडकला. गाडीचा वेग मध्यम असल्याने मांजा समोरून गळ्याला अडकला. त्यामुळे यात जैनचा गळा चिरला गेला.
गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले गेले. ही बाब वसिम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी जागेवर थांबवली आणि जखमेची पाहणी केली. जखम खोल आणि त्यातून होणारा रक्तस्राव अधिक असल्याने लगेच शहरांतील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य पाहता त्याचे ऑपरेशन करावे लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार काल रात्री उशिरा जैनवर शस्त्रक्रिया पार पडली.
खरं तर गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांजावर बंदी आहे. नगर परिषदेला असा मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने सर्रास दुकानांवर हे मांजे विक्रीला आहेत. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजे विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. सदर घटनेचे गांभीर्य पाहता संबंधित विभागाने यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.