महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बोगस बियाणे विकणे मध्य प्रदेशातील कंपनीला भोवले
By विलास गावंडे | Published: March 26, 2024 10:12 PM2024-03-26T22:12:07+5:302024-03-26T22:13:15+5:30
ग्राहक आयोगाचा दणका : व्याजासह भरपाई देण्याचा आदेश
यवतमाळ : विक्रेत्यामार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बोगस बियाणे विकणे मध्य प्रदेशातील कंपनीला भोवले. ग्राहक आयोगाने या कंपनीला चपराक दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नऊ टक्के व्याजासह भरपाई देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. तक्रार समितीने बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचा निष्कर्ष दिल्यानंतरही कंपनीने भरपाई नाकारली होती.
राळेगाव तालुक्यातील एकलारा येथील नरेंद्र रामाजी ससाणे यांनी वडकी येथील बोथरा कृषी केंद्रातून अंकुर सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. त्यांच्या साडेतीन एकर शेतात या बियाण्यांची पेरणी त्यांनी केली. वातावरण अनुकूल असतानाही बियाण्यांची पूर्ण क्षमतेने उगवण झाली नाही. याविषयी कृषी केंद्र संचालकांनी आपण केवळ विक्रेता असल्याचे सांगितले. बियाण्यांची चांगली उगवण झाली नसल्यास कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले.
नरेंद्र ससाणे यांनी या प्रकाराविषयी तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली. या समितीने शेताची पाहणी करून अहवाल सादर केला. यात त्यांनी नरेंद्र ससाणे यांनी लागवड केलेल्या वाणाची उगवण योग्य झाली नाही, सरासरी ५४.२८ टक्केच उगवण झाल्याचा अभिप्राय दिला. यावरून बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाले, तरीही कंपनी भरपाई देण्यास तयार नसल्याने ससाणे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.
स्टार ऑरग्यानिक सोल्युशन (खंडवा, ता.जि. खंडवा, मध्य प्रदेश), अंकुर सीड्स प्रा.लि. नागपूर आणि इतर दोघांविरुद्ध ही तक्रार होती. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे आणि सदस्य ॲड. हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये स्टार ऑरग्यानिक आणि अंकुर सीड्सने पुरविलेले बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाले. स्टार ऑरग्यानिक आणि अंकुर सीड्सने नरेंद्र ससाणे यांना सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी ५३ हजार २०० रुपये नऊ टक्के व्याजासह द्यावे. शिवाय, मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. या प्रकरणातून वडकी येथील विक्रेता बोथरा कृषी केंद्राला मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.