नापिकीने त्रस्त दाम्पत्याने संपवली जीवन यात्रा
By सुरेंद्र राऊत | Published: April 14, 2024 08:38 PM2024-04-14T20:38:30+5:302024-04-14T20:38:58+5:30
मक्त्याची शेती आली अंगलट : सकाळी घरून गेले दुपारी विहिरीत आढळले मृतदेह
आर्णी (यवतमाळ) : भुमिहीन शेतमजूर दाम्पत्याने गावातील काही शेती मक्त्याने (ठेक्याने) केली हाेती. सतत प्रयत्न करूनही शेतात प्रचंड नापिकी झाली. त्यात शेतमालाचे भाव पडले, यातून आर्थिक अडचणीत आलेल्या शेमजूर दाम्पत्यावर कर्जाची डाेंगर वाढतच गेला. त्यात विवाहित मुलीची सिझर प्रसुती करावी लागली. याचा खर्चाचा ताळमेळ बसविता प्रचंड नैराश्य आल्याने दाम्पत्याने दाेन मुली व एक मुलाला मागे ठेवून जगाचा निराेप घेतला. दाेघेही रविवारी सकाळी ७ वजाता मक्त्याच्या शेतात गेले. तेथे त्यांनी विहिरी उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना आर्णी तालुक्यातील डेहणी रविवारी दुपारी १२ वाजता उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
किशोर बाळकृष्ण नाटकर (४५), वनिता किशोर नाटकर (४०) दाेघेही रा. डेहणी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. किशाेर व वनिता दाेघेही प्रचंड मेहनती हाेते. दरवर्षी ते गावातील शेतकऱ्यांची जमिन मक्त्याने करत हाेते. काही दिवस त्यांनी शेतातून चांगले उत्पन्न काढले. मात्र मागील वर्षी त्यांना शेतात प्रचंड नुकसान झाले. निर्सगाचा लहरीपणा, पडलेले शेतमालाचे भाव यामुळे मक्त्याच्या शेतीतून त्यांना मजूरीचेही पैसे मिळाले नाही. अशातच माेठ्या मुलीची प्रसुती करण्याची जबाबदारी आली. तिच्यावर माेठा खर्च झाला. घरात दुसरी लग्नाची मुलगी आहे, पाेरगाही वयात आला. अशा स्थितीत आपण कर्जदाराचे देणे कसे चुकवायचे काैटुंबिक जबाबदारी कशी पूर्ण करायची हा प्रश्न नाटकर दाम्पत्याला सतावू लागला. याच विवंचनेत दाेघेही रविवारी सकाळी घराबाहेर पडले. शेतमालक वामन माधव दिघळकर यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेतली. याच शेतातून दुपारी जात असलेल्या एकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने याची माहिती गावात दिली. संपूर्ण गाव शेतातील विहिरीजवळ गाेळा झाला. आर्णी पाेलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. दाेघांचेही मृतदेह विहिरी बाहेर काढून शविचिकित्सेसाठी आर्णी ग्रामीण रूग्णालयता आणले.
या प्रकरणी श्रीकांत चिदकाजी नाटकर याच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद घेतली आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जमादार अशाेक टेकाळे व मुनेश्वर करत आहे.