मुंबईतून निघालेल्या ड्रग्ज तस्कराला यवतमाळात अटक; एमडी ड्रग्ज घेतला ताब्यात
By सुरेंद्र राऊत | Published: February 15, 2023 06:59 PM2023-02-15T18:59:22+5:302023-02-15T18:59:49+5:30
मुंबईतून निघालेल्या ड्रग्ज तस्कराला यवतमाळात अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ : शहरात नशेसाठी थेट मुंबईतून महागडे ड्रग्ज आणले जात होते. याचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कारवाई करीत भंडफोड केला. एमडी ड्रग्ज (सिन्थेटिक ड्रग्ज) याचा नशा यवतमाळातही केला जातो. हा धक्कादायक प्रकार पोलिस कारवाईने उघड झाला. मुंबईतील गावदेव डोंगार येथून तस्कराच्या माध्यमातून हे ड्रग्ज येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावत बुधवारी सकाळी आरोपीला मुद्देमालासह अटक केली.
रहीम खान कुद्दूस खान (५०) रा. मोसीन ले-आऊट डोर्ली रोड यवतमाळ ह.मु. गावदेव डोंगार उस्मानिया दुध डेअरीमागे अंधेरी वेस्ट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो १९ ग्रॅम ७२ मिली एवढे एमडी ड्रग्ज घेवून यवतमाळात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून डोर्ली बायपास परिसरात त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची खुल्या बाजारातील किमत १ लाख १८ हजार ३२० रुपये इतकी आहे. आरोपीविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाणे येथे एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप परदेशी, सहायक निरीक्षक विवेक देशमुख, सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे, उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार साजीद सय्यद, अजय डोळे, बंडू डांगे, विनोद राठोड, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, जितेंद्र कोठारी, विवेक पेठे यांनी केली.
महानगरात पार्टी ड्रग्ज म्हणून प्रसिद्ध
एमडी ड्रग्ज हा महानगरात तरुणांमध्ये पार्टी ड्रग्ज म्हणून प्रसिद्ध आहे. याचा नशा दीर्घकाळ टिकतो. त्या नशेत कुठलेही भान राहत नाही. याची किमत एका ग्रॅमला सहा हजार इतकी आहे. महानगरात त्याचा सर्रास वापर होतो. यवतमाळ सारख्या आडवळणावरच्या शहरात हा ड्रग्ज वापरला जातो. हीच मोठी धक्कादायक बाब आहे.
असे करतात सेवन
हा ड्रग्ज गुटखा, खर्रा यात टाकून घेतला जातो. काहीजण थेट नाकाने याची भुकटी ओढतात. यातून मोठा परिणाम मानवी मज्जातंतूवर होते. त्यामुळे दीर्घकाळ नशा करणारी व्यक्ती आपल्याच तंदरीत गुंगत असते.
काळजाच्या डबीतून आणले ड्रग्ज
ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटकडून अतिशय अशक्त प्रकृतीच्या व्यक्तीची कुरिअर बॉय म्हणून निवड केली जाते. पोलिसांच्या हाती लागला तरी त्याच्याकडून फारसे वदवता येत नाही. मुंबईवरुन ड्रग्ज घेवून निघालेला रहीम खान याने काजळाच्या दोन डब्यांमध्ये १९ ग्रॅम ७२ मिली ग्रॅम एवढी ड्रग्ज आणली होती. कायद्यानुसार ५० ग्रॅम पेक्षा अधिक असेल तर त्याला व्यावसायिक तस्करीचे स्वरूप देता येते. वैयक्तिक वापरासाठीच्या वजनातच तस्करांकडून कुरिअर बॉयला ड्रग्ज पुरविले जाते. जेणे करून न्यायालयात मोठी शिक्षा होणार नाही हा त्यांचा हेतू असतो.
यवतमाळातील शौकिन रडारवर
थेट मुंबईतून नशेसाठी ड्रग्ज मागविणारे यवतमाळातील ते शौकिन कोण याचा तपास आता पोलिस करीत आहे. आरोपीला पोलिस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडे ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची प्राथमिक माहिती आहे. त्या आधारावर आणखी खोलात शिरुन स्थानिक पातळीवरच्या नेटवर्कचे धागेदोरे हाती लागतात काय, याचाही शोध घेतला जात आहे.