यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी

By सुरेंद्र राऊत | Updated: December 10, 2024 22:36 IST2024-12-10T22:36:11+5:302024-12-10T22:36:27+5:30

आर्णी मार्गावरील राणाप्रताप गेटसमोर थरार

A drunken car driver blew up six vehicles in Yavatmal, injuring three | यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी

यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी

यवतमाळ : शहरातील आर्णी मार्गावर मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सुसाट जाणाऱ्या कारचालकाने सहा वाहनांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीविक्रेत्यांनाही या वाहनाने ठोकरले. या घटनेमुळे वर्दळीच्या रस्त्यावर एकच खळबळ उडाली. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला घटनास्थळी चांगला चोप दिला. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

एमएच-४२-एएफ-१००८ क्रमांकाची कार आर्णी रोडने वडगावकडे जात होती. सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वारासमोर कार चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सुसाट कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या वाहनांना धडक देत पुढे धावू लागली. रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भाजीपाला व्यावसायिकांच्या अंगावरून ही कार फरपटत गेली. अखेर हातगाडीवर कार धडकल्यानंतर ती थांबली. काही मिनिटे येथे अक्षरश: अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते. नागरिकांची प्रचंड गर्दी घटनास्थळी जमली. 

घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले. जखमी अक्षय उमरे (३०), दिलीप दारूटकर (५५) दोघे रा. पुष्पकुंज सोसायटी, यवतमाळ यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यातील अक्षयची प्रकृती गंभीर आहे. तर दिलीप यांच्या डोक्याला मार लागला असून पाय फ्रॅक्चर आहे. इतर जखमींची माहिती मिळू शकली नाही. वाहनचालकाची माहिती पोलिस पथक घेत होते. अपघातानंतर संतप्त जमावाकडून कारची तोडफोड करण्यात आली. रात्री पावणे दहावाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक खोळंबलेली होती.

Web Title: A drunken car driver blew up six vehicles in Yavatmal, injuring three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.