उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 07:14 AM2023-04-23T07:14:38+5:302023-04-23T07:15:31+5:30
उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली.
यवतमाळ : अधिकार नसताना केलेला उपचार महिला डॉक्टरच्या अंगलट आला. तक्रारकर्त्याला पाच लाख रुपये नुकसानभरपाई सव्याज द्यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. लोणाडी (ता. नेर) येथील ममता राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर डॉ. शबिना मिर्झा (नेर) यांच्याविरुद्ध हा निर्णय देण्यात आला आहे.
ममता राठोड यांना प्रसूतीकरिता डॉ. मिर्झा यांच्या नेर येथील ताज नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. डॉ. मिर्झा यांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात नेले. दोन खासगी रुग्णालयांत उपचारानंतरही प्रकृती सुधारली नाही. उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली.
शस्त्रक्रियेचा अधिकार नाही
ममता राठोड यांची प्रसूती करणाऱ्या डॉ. शबीना मिर्झा या डीएचएमएस आहेत. त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नाही, असे आयोगाने या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. या प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना गैरअर्जदार करण्यात आले होते. आयोगाने त्यांना दोषमुक्त केले आहे.