काहीच नसते दूर.. चला करूया टूर..! समग्र शिक्षातून चार दिवसांची सहल रवाना
By अविनाश साबापुरे | Published: March 26, 2024 05:44 PM2024-03-26T17:44:47+5:302024-03-26T17:46:48+5:30
२६ ते २९ मार्च या कालावधीत समग्र शिक्षा अंतर्गत ‘राष्ट्रीय आविष्कार’ उपक्रमा अंतर्गत राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अविनाश साबापुरे, यवतमाळ : समग्र शिक्षा आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय सहल आयोजित करण्यात आली आहे. ही सहल मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद येथून रवाना झाली.
२६ ते २९ मार्च या कालावधीत समग्र शिक्षा अंतर्गत ‘राष्ट्रीय आविष्कार’ उपक्रमा अंतर्गत राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष बसची व्यवस्था करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातून ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक स्थळांची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी ‘राष्ट्रीय आविष्कार’ उपक्रम राबविला जात आहे. यात विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर व परिसरातील स्थळे दाखविली जाणार आहेत. जगप्रसिद्ध लोणार सरोवार, संभाजीनगर परिसरातील ऐतिहासिक स्थळे, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ, पवनचक्की, बिवी का मकबरा, जायकवाडी प्रकल्प, पैठण, शिर्डी, शनिशिंगणापूर, शेगाव आदी स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत.
मंगळवारी सकाळी सहलीच्या बसला शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, निता गावंडे, समग्र शिक्षाचे जिल्हा संगणक तज्ञ संदीप शिरभाते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी धनंजय गव्हाणे, सहल प्रमुख विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, राजहंस मेंढे आदींच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
सहलीत विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी संदीप शिरभाते, दिपीका गुल्हाने, वैशाली गायकवाड (यवतमाळ), लक्ष्मण ढाकरे (उमरखेड), कविता राऊत (मारेगाव), सुनिल वाटेकर (वणी), रुपाली फाले (यवतमाळ), वंदना डगवार (कळंब), अश्विनी पाळेकर (राळेगाव) या शिक्षकांनाही पाठविण्यात आले आहे. २९ एप्रिल रोजी शेगाव दर्शनानंतरही ही सहल परतणार आहे.