नीलगायींची शिकार करून जाणाऱ्या टोळीला रंगेहात अटक

By सुरेंद्र राऊत | Published: April 16, 2023 06:33 PM2023-04-16T18:33:09+5:302023-04-16T18:33:19+5:30

काळीदौलत परिसरात शिकार : दोन वाहनासह सातजण लागले हाती

A gang of nilgai poachers was arrested red-handed | नीलगायींची शिकार करून जाणाऱ्या टोळीला रंगेहात अटक

नीलगायींची शिकार करून जाणाऱ्या टोळीला रंगेहात अटक

googlenewsNext

महागाव (यवतमाळ) : पुसद वनविभाग महागाव तालुका वनपरिक्षेत्रातील काळी (दौ.) वर्तुळामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत शिकाऱ्यांच्या टोळीला जेरबंद केले. या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये तीन नीलगाई मृतावस्थेत सापडल्या. या टोळीचा म्होरक्या अंजूम दोन साथीदारांसह पसार होण्यात यशस्वी झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पुसद विभागातील पथक शनिवारी रात्री गस्तीवर असताना मोहदी ते काळीदौलत रस्त्याने वन्यप्राण्यांची शिकार करून एक टोळी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी पी.एस. राऊत यांना माहिती देत परिसरात नाकाबंदी केली. सापळा रचून काळीदौलत कडे जाणाऱ्या वाहनांना पकडण्यात आले. त्यातील एक वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन वाहने पोलिसांच्या हाती लागली. यामध्ये एक स्कार्पिओ (क्र. एम एच २० एजी २००५) व क्वॉलिस (एमएच-२९-एफ-०१६९) ही वाहन आहेत. ज्यामध्ये तीन नीलगाईंची शिकार करून सत्तुराने त्यांचे तुकडे करण्यात आले होते. आरोपी आदिल खान एजाज खान (३०), समीर खान असद खान (२७), शेख शाहरुख शेख उस्मान (२६) तिघे रा. रा. वसंतनगर पुसद, फैय्यद अहेमद मुश्ताक अहेमद (२५) रा. गढीवार्ड पुसद, उस्मान खान कदीर खान (३८) रा. वजीराबाद जि. नांदेड, इम्रान अहमद सुलतान (२३), देगलूर जि. नांदेड, शेख असद शेख युनुस (२०) रा. खडकपुरा जि. नांदेड यांना अटक करण्यात आली.

पोलिस उपनिरिक्षक सागर भारस्कर यांनी नीलगायीची शिकार झाल्याची माहिती वन विभागाला दिली. त्यावरून अशोक सोनकुसरे  उपवनसंरक्षक पुसद यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांनी पोलिसांसोबत सापळा रचला.
गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये मागील बाजूस वन्यप्राणी तीन निलगायी ज्यांचे सहा तुकडे करण्यात आले होते.  गाडीमध्ये ताजे रक्त दिसुन आले. तर स्कार्पिओमध्ये आरोपींसह रक्ताने माखलेले ३ सुरे, एक कोयता हाती लागला.

या प्रकरणात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही कारवाई सहायक निरीक्षक अमोल सांगळे, उपनिरीक्षक सागर भारस्कर, जमादार तेजाब रणखांब, सुनील पंडागळे, मोहंमद ताज, दिगंबर गिते, वन विभागातील आरएफओ पी.एस. राऊत, कुणाल लिमकर, पी.पी. गंगाखेडे, एस.बी. बदुकले, जी.बी. राठोड, एस.एच. चिरंगे, आर.आर. राठोड, शेख मुकबीर यांनी केली.
चौकट.
म्होरक्या  अंजूमसह तिघे पसार
पुसद परिसरात सतत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणारा अंजूम खान हा पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या मांसाची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अंजूम असल्याचे पुढे आले आहे. मात्र कारवाई दरम्यान अंजूम हा इम्रान व गोपाल या दोन साथीदारासह पसार होण्यात यशस्वी झाला. वन विभाग व पोलिस त्याच्या मागावर आहे.

Web Title: A gang of nilgai poachers was arrested red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.