क्रिकेटची पीच तयार करताना पाईपमध्ये दबून चिमुकल्याचा मृत्यू
By अविनाश साबापुरे | Published: February 4, 2024 06:38 PM2024-02-04T18:38:38+5:302024-02-04T18:39:26+5:30
चौथीचा विद्यार्थी : वडसद तांडा गावात शोककळा
पुसद: क्रिकेटची पीच सिमेंट पाईने सपाट करीत असताना हा पाईप अंगावरून गेल्याने दहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील वडसद तांडा येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. आर्यन जयेश चव्हाण, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
आर्यन हा वडसद तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. त्याचे वडील जयेश चव्हाण हे ईनापूर येथील मूळ रहिवासी आहेत. वडसद तांडा ही त्यांची सासरवाडी आहे. ते पत्नीसह वडसद तांडा येथे गेल्या काही दिवसांपासून रहायला आले आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते ऊसतोड कामगार म्हणून काम करतात.
रविवारीही ते ऊस तोडीसाठी बाहेरगावी गेले होते. आर्यन आजी आजोबाकडे होता. वडसद गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये क्रिकेटची पीच सिमेंट पाईपने तयार केली जात होती. त्या पाईपखाली येऊन आर्यनचा मृत्यू झाला. पुसद ग्रामीणच्या ठाणेदारांनी घटनेचा पंचनामा केला. रविवारी पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आर्यनच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.