खेळत असलेल्या बालिकेला भरधाव ट्रकने चिरडले, जागीच ठार
By अविनाश साबापुरे | Published: August 24, 2023 07:29 PM2023-08-24T19:29:00+5:302023-08-24T19:29:14+5:30
संतप्त जमावाने महामार्गावर रोखली वाहतूक, ट्रक जाळण्याचा प्रयत्न
उमरखेड (यवतमाळ) : घरासमोरून गेलेल्या महागार्गावर खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेला भरधाव ट्रकने चिरडले. यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी (ज) येथे घडली. बालिकेला चिरडल्यानंतर हा ट्रक समोरून येणाऱ्या बसला घासत उमरखेडकडे निघून गेला. काही युवकांनी पाठलाग करुन ट्रकचालकाला चोप दिला. तसेच ट्रकही जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच चालकाला ताब्यात घेतले.
तश्कीन फातेमा शेख माजीद (५ वर्षे) रा. सुकळी असे मृत बालिकेचे नाव आहे. तर सुनील कुमार भोले पटेल (३४) रा. मध्यप्रदेश असे यातील ट्रकचालकाचे नाव आहे. तश्कीनच्या घरासमोरूनच नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग गेला असून तेथे उड्डाणपुलाचे काम प्रलंबित आहे. गुरुवारी दुपारी तश्कीन आपल्या घरासमोर खेळत असताना महागावकडून उमरखेडकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच ४० सीडी ९५५२) तिला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. बालिकेला चिरडल्यानंतर हा ट्रक समोरून आलेल्या आदिलाबाद-माहूर (टीएस ०१ यूसी६६३३) या बसला घासत उमरखेडकडे भरधाव निघून गेला.
सुदैवाने बसला धडक बसली नसल्याने प्रवासी बचावले. यावेळी सुकळी येथील काही युवकांनी पाठलाग करून ट्रकला उमरखेड शहरातील आंबेडकर चौकात पकडले. त्यानंतर त्याला मारहाण केली. तिथे आलेले पोलीस जमादार संदीप ठाकूर व गिरुप्पा मुसळे यांनी ट्रक चालकास पोलीस ठाण्याकडे रवाना केले. तोपर्यंत संतप्त युवकांनी ट्रक ताब्यात घेऊन घटनास्थळाकडे नेऊन जाळण्याच्या प्रयत्न सुरू केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत सुकळीजवळ तो ट्रक ताब्यात घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्यासह उमरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोहीत बेंबरे, वाहतूक कर्मचारी व आरसीपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने घटनास्थळावर गर्दी केली होती. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बनवून द्या, असा आग्रह जमावाने धरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी एसडीपीओंनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ स्पीडब्रेकर करण्यात येतील, असे सांगितल्यानंतर जमावाने रस्ता मोकळा केला. ट्रकचालक सुनीलकुमार भोले पटेल याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ करीत आहेत.